सातारा : ठाणे पोलीस दलात कर्तव्य बजावत असलेले विजय रघुनाथ थोरात (वय ५०, सध्या रा. ठाणे मूळ. रा.धामणेर ता.कोरेगाव) यांचा एसटीमधून मूळ गावी येत असताना शिरवळ येथे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, विजय थोरात हे मूळचे धामणेर गावचे आहेत. ते पत्नीसोबत ठाणे- कोल्हापूर या एसटीने सोमवारी सकाळी गावी येत होते. एसटी शिरवळनजीक आल्यानंतर त्यांच्या छातीत दुखू लागले. वेदना तीव्र झाल्याने एसटी चालकाने एसटी शिरवळमधील हॉस्पिटलमध्ये नेली. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेने त्यांच्या पत्नीला जबर मानसिक धक्का बसला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. विजय थोरात यांच्याबाबत सर्व माहिती घेवून त्यांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली.