कऱ्हाड : बेलवडे बुद्रुक येथे २५ ऑगस्ट रोजी मृतावस्थेत सापडलेल्या बिबट्याच्या मृत्यू हा आतड्याला संसर्ग होऊन त्याठिकाणी गाठ झाली. त्यामध्ये पू झाल्याने त्याचा संसर्ग संपूर्ण बिबट्याच्या शरिरात पसरल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे.
बेलवडे बुद्रुक येथील तेलक शिवारात २५ ऑगस्ट रोजी सकाळी येथील शेतकरी शिवाजी पवार हे जनावरांसाठी वैरण काढण्यासाठी गेले असता, त्यांना बिबट्याचा बछडा दिसला. यानंतर त्यांनी तेथून जीव वाचविण्यासाठी धूम ठोकली. ही माहिती ग्रामस्थांना दिल्यानंतर तेथे ग्रामस्थ आले व तातडीने याची माहिती वन विभागाला देण्यात आली.
वन विभागाने तत्परतेने येथे येत हा मृतावस्थेत असलेल्या बिबट्या पहिला. त्याला गाडीतून कऱ्हाड येथे नेण्यात आले. बिबट्याचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला आहे, यासाठी त्याचे शवविच्छेदन केले गेले. त्याचा अहवाल नुकताच आला आहे. शेत शिवारातून फिरताना अथवा त्याने उडी मारताना त्याच्या पोटावर मार लागलेला असावा, त्यामुळे त्याच्या आतड्यावर गाठ तयार झाली होती. हा प्रकार साधारण दोन महिन्यांपूर्वी झाला असावा, असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. त्या गाठेत पू तयार झाला होता. त्या गाठेचा संसर्ग संपूर्ण बिबट्याच्या शरिरात पसरल्याने त्यातच बिबट्याचा मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. साधारण दोन वर्षे वयाचा मादी बिबट्या मृतावस्थेत सापडला होता.
कालवडे, बेलवडे, नांदगाव परिसरात अनेकांना रोजच शेतशिवारात बिबट्याचे दर्शन होते. सकाळी, संध्याकाळी शेतीचे काम करत असताना अनेकांनी बिबट्या फिरताना पहिला आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी शेतीची कामे करताना जीव मुठीत घेऊन करत आहेत.
कोट.
बेलवडे येथे मृतावस्थेत सापडलेल्या बिबट्याचा मृत्यू त्याच्या शरिरातील अंतर्गत संसर्गामुळे झाला आहे. त्याला दोन महिन्यांपूर्वी पोटाला जखम झाली असावी व त्यातून पोटात गाठ झाली होती. त्यात पू झाला व त्यातून संपूर्ण शरिरात संसर्ग पसरला असावा. त्यातून बिबट्याचा मृत्यू झाला आहे.
- डॉ. दिनकर बोर्डे
सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकारी, कऱ्हाड.