वाई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाई तालुक्यात प्रशासनाने सकाळी सात ते अकरा ही भाजीपाला व इतर घरगुती वस्तू खरेदीसाठीची वेळ ठरवून दिलेली आहे, गर्दी होऊ नये म्हणून पालिकेने मुख्य भाजी मंडई बंद करून प्रत्येक प्रभागात भाजी विक्रीस परवानगी दिली आहे. या वेळेत शहरातील व ग्रामीण भागातील लोक जीवनावश्यक वस्तू, भाजी व इतर गोष्टी खरेदी करण्यासाठी रस्त्यावर गर्दी करतानाचे चित्र वाई शहरासह ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.
लोक कोरोना आजाराचे गांभीर्य विसरल्यासारखे रस्त्यावर येतायत, खरेदीसाठी रस्त्यावर दुचाकी व चारचाकी धावताना दिसत आहेत. पोलीस प्रशासनाने याचे गांभीर्य ओळखून वेळ वाढवावी, अन्यथा घरपोच सेवा द्यावी. वेळ कमी असल्याने लोक रस्त्यावर उतरून कोरोनाला निमंत्रण देत आहेत. प्रशासनाला कोरोना साखळी तोडायची आहे, की तशीच कायम चालू ठेवायची आहे, हे सर्वसामान्य लोकांच्या लक्षात न येणारी गोष्ट आहे, अकरानंतर रस्त्यावर प्रचंड शांतता असते; परंतु आधी दोन तास झालेली गर्दी कोरोनाला टाळू शकत नाही, कोरोना वेळ सांगून समाजात फिरत नाही, हे प्रशासनाने लक्षात घेण्याची बाब आहे. नियम तयार करताना कोणते निकष वापरण्यात येतात, हे समजण्यापलीकडचे आहे. सकाळी नेहमीप्रमाणे नागरिकांनी गर्दी केल्यास प्रशासनाने व पोलिसांनी त्यांना तत्काळ अटकाव करून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून देत बाजार बंद करायला हवा, बँका, मेडिकल्स, किराणा मालाची दुकाने, पेट्रोल पंप, दुकानांमधून गर्दी सुरू आहे.
चौकट..
अनेक बँकांमध्ये गर्दी...
बँका सुरू असल्या तरी व्यवहारांच्या नावाखाली बँकांना गर्दीवर अंकुश ठेवता आला नाही. सरकारी बँकेत गर्दी होत आहे. परंतु खासगी बँकांची वेळ कमी केली आहे. बाजार समितीमध्ये शेतकरी माल घेऊन आल्याने गर्दी पाहायला मिळाली. नागरिकांनी भाजी खरेदीच्या बहाण्याने झुंबड उठविली होती. प्रशासनाकडून कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी ठोस पावले उचलताना दिसत नाही.
चौकट..
मुंबई-पुण्याहून आलेल्यांची यादी करणे गरजेचे..
कोरोनाने मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याने प्रशासन गोंधळून गेले आहे. ग्रामीण भागातील नागरिक उन्हाळ्याची सुटी लागल्यासारखे वावरताना दिसत आहेत. पोलीस पाटलाने मुंबई-पुण्याहून आलेल्यांची फक्त यादी तयार करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात लोकांना हटकल्यास वाद होताना दिसत आहेत. शहरातून येणाऱ्या लोकांवर कसलेही बंधन नाही आणि तेच कोरोना वाढीस निमंत्रण देत आहे. कोरोना साखळी तोडायची झाल्यास नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.