लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जावळी तालुक्यातील मृत कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह आला असून कटगुणमधील रिपोर्टची प्रतीक्षा आहे. दरम्यान, मागील दोन दिवसांत जिल्ह्यात कोठेही कोंबड्या मृत्यूमुखी पडल्याचा प्रकार घडलेला नाही.
बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आतापर्यंत माण तालुक्यातील दोन गावात तर खंडाळा आणि कऱ्हाड तालुक्यातील प्रत्येकी एका गावात मृत कोंबड्या आढळून आल्या होत्या. यामधील खंडाळा तालुक्यातील मरीआईची वाडीमधील कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूने झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले होते. कऱ्हाड तालुक्यातील हणबरवाडी आणि माणमधील हिंगणी व बिदालमधील मृत कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. असे असतानाच खटाव तालुक्यातील कटगुणमध्ये शनिवारी आणि रविवारी काही कोंबड्या मृत्यूमुखी पडल्याचे दिसून आले. तसेच त्यांच्या अंगावर वणही होते. त्यामुळे मुंगसाच्या हल्ल्यात या कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत होते. या मृत कोंबड्यांचे नमूने बर्ड फ्लूच्या तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. याचा अहवाल प्रतीक्षेत आहे. तसेच कुडाळमध्येही कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. याचा अहवालही निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे पशुपालकातील भीती कमी होण्यास मदत झाली आहे.
चौकट :
कावळ्यांच्या अहवालाची प्रतीक्षा...
जिल्ह्यातील शिरवळ, भिलार, मलवडी आणि तडवळेमधील मृत कावळ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. मागील आठ दिवसांपासून या अहवालांची प्रतीक्षा आहे.
.......................................................