सातारा : जिल्ह्याच्या विविध भागांना, मुख्यत्वे दुष्काळी तालुक्यांना वादळी पावसाने आज, बुधवारी दुसर्या दिवशीही झोडपून काढले. खटाव आणि फलटण तालुक्यांतील काही भागांमध्ये या पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. खटाव तालुक्यातील मायणी, फलटण तालुक्यातील आदर्की परिसराला तसेच खंडाळा तालुक्यातील काही गावांना आज सायंकाळी वादळी वारा, पाऊस आणि गारांचा तडाखा बसला. झाडे उन्मळून पडणे, घरांवरील छपरे उडून जाणे, विजेचे खांब कोसळल्याने वीजपुरवठा खंडित होणे अशा घटना घडल्या. मायणीजवळील कलेढोण, पाचवड, विखळे, हिवरवाडी, चितळी, म्हासुर्णे आदी गावांत वादळी पाऊस झाला. काही ठिकाणी जोरदार गारपीटही झाली. या पावसामुळे हजारो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आदर्की परिसरातही जोरदार वादळी पाऊस आणि गारांचा वर्षाव झाला. त्यामुळे टोमॅटो पीक आणि डाळिंबांच्या बागांचे नुकसान झाले आहे. वाघोशी, कोºहाळे, बिबी, कापशी, आळजापूर, हिंगणगाव, सासवड भागात पाऊस झाला. अनेक ठिकाणी झाडे आणि विजेचे खांब कोसळून वीजपुरवठा खंडित झाला. (प्रतिनिधी)
वादळी पावसामुळे दुसर्या दिवशीही हानी
By admin | Updated: May 29, 2014 00:32 IST