सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यातील डीसीसी बँकेत घुसखोरी करण्याची भीष्म प्रतिज्ञा भाजप-शिवसेनेच्या मंत्र्यांनी केली खरी; मात्र निवडणूक जाहीर होऊन दहा दिवस उलटले तरीही पालकमंत्री विजय शिवतारे अन् भाजपचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील हे दोघेही साताऱ्याकडे फिरकले देखील नाहीत. त्यामुळे ‘दादा-बापू’ गेले कुणीकडे ? असा सवाल खुद्द त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते करीत आहेत. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी पालकमंत्री विजय शिवतारे आणि सहकारमंत्री चंद्रकात पाटील यांनी या निवडणुकीत उतरण्याची भली मोठी घोषणा केली होती. त्यामुळे दोन्हीही पक्षाच्या कार्यकर्त्यांत चैतन्य निर्माण झाले होते. पण, निवडणूक जाहीर होऊन आता दहा दिवस उलटून गेले तरी दोन्ही मंत्री साताऱ्याकडे फिरकलेही नाहीत. त्यामुळे जिल्हा बँक निवडणूक लढविण्याच्या प्रतिज्ञेचे काय झाले, असा प्रश्न सेना-भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही पडला आहे. त्यातच भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. भरत पाटील यांना जिल्हा बँक निवडणुकीत काही कारणाने अर्जही भरता आला नाही. (प्रतिनिधी) घोषणा पोकळ ठरणार? राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासून सातारचे पालकमंत्री व सहकारमंत्री हे नेहमीच साताऱ्यात असायचे. अनेकवेळा त्यांनी जिल्ह्यातील सर्व निवडणुका लढविणार, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे जिल्हा बँक निवडणुकीत ते उतरतील, असा अंदाज होता; पण त्यांची घोषणा पोकळ ठरणार की काय, अशी भीती कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे.
‘दादा-बापू’ गेले कुणीकडे?
By admin | Updated: April 13, 2015 00:04 IST