खटाव : रब्बी पिके जोमात आली असली तरी अपुऱ्या पाण्यावाचून ती कोमात जाण्याची भीती शेतकरी वर्गाला लागली आहे. शेतकरी आता पिकांना पाणी देण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र शिवारात दिसत आहे. ज्यांची सोय नाही अशा शेतकरी वर्गाने १५0 रुपये तासाने पाणी विकत घेऊन पिके भिजवण्याचे काम सुरू केले आहे. नेर तलावातील पाण्यावर बहुतांश शेती अवलंबून असल्यामुळे पाटातील पाणी मिळेल या आशेवर असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पाण्याच्या आशेवर बसलेल्या शेतकरी वर्गाला आता मिळेल तेथून पाणी पिकांना देण्यासाठी धडपड करावी लागत आहे. येरळा नदीचे पात्र कोरडेच पडले आहे. त्यातच लोणीला जाणाऱ्या पुलाचे बांधकाम सुरू असल्यामुळे नदी पात्रात थोडेफार साचलेले पाणी तसेच उतारावरुन वाहत आलेले सांडपाण्याचे डबक्यातील पाणी नदी पात्रालगत असणाऱ्या शेतकरी वर्गाने आता मोटारी लावुन शेती सिंचनासाठी वापरण्यास सुरवात केली आहे. जेणे करून रब्बी पिकांना जीवदान मिळेल. यामुळे शेतकरी वर्ग आता कडाक्याच्या थंडीत सुध्दा थंडीची तमा न बाळगता पाणी देत आहेत. नेर तलाव ५0 टक्के भरलेला असल्यामुळे शासकीय नियमानुसार राखीव ठरावीक पाणी साठा ठेउन उर्वरीत पाणी शेती सिंचनासाठी सोडले जाईल या आशेवर असणाऱ्या शेतकरी वर्गाला मात्र नेरचे पाणी मिळण्याच्या आशा धुसर झाल्या आहेत. त्या मुळे ज्याच्या शेतात पाण्याची सोय आहे. (वार्ताहर)
पिके जोमात; पण पाण्याविना कोमात...
By admin | Updated: December 29, 2014 23:41 IST