सातारा : तालुक्यातील डबेवाडी आणि गजवडी परिसरातील तीन हॉटेल व्यवस्थापनांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मिलिंद धुमाळ, रोहित जाधव, सोमनाथ दळवी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोरोना महामारीमुळे सातारा जिल्ह्यातील रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत संचारबदी लागू करण्यात आली आहे. मात्र, अनेक हॉटेल व्यवस्थापने त्याचा उल्लंघन करत आहेत. सातारा तालुक्यातील डबेवाडी येथील हॉटेल ब्लू नेचर हे दिलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या प्रकरणी मिलिंद दत्तात्रय धुमाळ (वय ३८, रा. श्री व सौ. अपार्टमेंट, सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सातारा तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई राजेंद्र भोंडवे यांनी तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार भोईटे हे करत आहेत.
डबेवाडी येथे सुरू असलेल्या अजिंक्य चायनीज रेस्टॉरंटचा चालक रोहित शामराव जाधव (वय २९, रा.झरेवाडी, ता.सातारा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार पोलीस शिपाई राजेंद्र भोंडवे यांनी दिली होती. अधिक तपास पोलीस हवालदार भोईटे हे करत आहेत. दरम्यान, सातारा तालुक्यातील गजवडी फाटा येथे सुरू असलेल्या हॉटेल शांताई गार्डनवर कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणी सोमनाथ शांताराव दळवी (वय ५९, रा.परळी, ता.सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक तपास हवालदार दीपक बर्गे हे करत आहेत.
कोरोना महामारीत लागू करण्यात आलेल्या आपत्कालीन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल व्यवस्थापनावर कारवाई करण्यात येत आहे. निश्चित केलेल्या वेळेत हॉटेल बंद होत नसून, काही ठिकाणी गर्दी करुन सामाजिक अंतर राखले जात नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास येत आहे. त्यानुसार, कारवाया केल्या जात आहेत.