लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा: मर्ढे (ता. सातारा) येथे भरधाव दुचाकीच्या धडकेत महिला गंभीर जखमी झाली होती. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अविचाराने व निष्काळजीपणे दुचाकी चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकीस्वार प्रदीप आप्पासाहेब चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माहिती अशी, मर्ढे येथे दि. १६ डिसेंबर रोजी मालन बाळासाहेब शिंगटे या चालत निघाल्या होत्या. यावेळी प्रदीप आप्पासाहेब चव्हाण हा दुचाकी (एमएच १० - ७१६५) भरधाव वेगाने चालवत होता. या दुचाकीची मालन शिंगटे यांना जोरदार धडक बसली. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. घटनेनंतर मालन शिंगटे यांना जखमी अवस्थेत सोडून प्रदीप चव्हाण पसार झाला. याप्रकरणी मालन यांचे पती बाळासाहेब गंगाराम शिंगटे (वय ७१, रा. मर्ढे) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलीस नाईक महांगडे अधिक तपास करत आहेत.