लोकमत न्यूज नेटवर्क
महाबळेश्वर : येथील पोलीस मैदानाशेजारी पालिकेने भाजी मंडईसाठी प्रशस्त इमारत उभी केली. मात्र, या इमारतीकडे विक्रेत्यांनी पाठ फिरविल्याने गेल्या अनेक वर्षांपासून महाबळेश्वरचा आठवडा बाजार रस्त्यावरच भरत आहे. मंडईसाठी बांधलेल्या इमारतीचा वापर आता न्यायालयासाठी केला जात आहे.
महाबळेश्वरच्या आठवडा बाजाराला अनेक वर्षांची परंपरा आहे. पूर्वी रामगड, गवळी आळी येथील मोकळ्या जागेत आठवडा बाजार भरत असे. कालांतराने हा बाजार पोलीस मैदानाजवळीत मोकळ्या जागेत भरू लागला. पालिकेने येथे गाळ्यांची उभारणी केल्याने आठवडा बाजारासाठी जागाच उरली नाही. नागरिक व विक्रेत्यांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी पालिकेने पोलीस मैदानाजवळ मंडई व आठवडा बाजारासाठी प्रशस्त इमारत उभारली. मात्र, ही या इमारतीला असुविधांचे ग्रहण लागल्याने विक्रेत्यांनी काही दिवसांतच येथून काढता पाय घेतला. गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून सेठ गंगाधर माखरिया हायस्कूलच्या लगत रस्त्याच्या दुतर्फा आठवडा बाजार भरत आहे.
या बाजारामुळे नागरिकांची परवड थांबत असली तरी जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वरमध्ये सुसज्ज मंडई नसणे ही बाब खेदजनक आहे. सध्या पालिकेने पोलीस ठाण्याजवळ नवी मंडई बांधली आहे; हा विषयही सध्या श्रेयवादात अडकला आहे. या ठिकाणी अगोदरच फळ व काही भाजी विक्रेत्यांचे पुनर्वसन होणार आहे. त्यामुळे या इमारतीत आठवडा बाजार भरण्याची शक्यता धूसरच आहे. रस्त्यावर दर मंगळवारी भरणाऱ्या आठवडा बाजारामुळे वाहतूककोंडीचा प्रश्न अत्यंत गंभीर होतो.
(चौकट)
येथे होऊ शकते व्यवस्था
गवळी आळी व रामगड येथे पूर्वी आठवडा बाजार भरला जात असते. या ठिकाणी आता झोपड्यांचे साम्राज्य पसरले आहे. पालिका प्रशासनाने थोडा प्रयत्न करून अनधिकृत झोपड्या काढल्यास या ठिकाणी पुन्हा भाजी विक्रेत्यांची व्यवस्था होऊ शकते. याशिवाय पोलीस मैदानाच्या मोकळ्या जागेचाही पालिकेपुढे पर्याय आहे.
(कोट)
महाबळेश्वरमध्ये रस्त्यावर भरणारा आठवडा बाजार हा गेल्या अनेक वर्षांपासूनची समस्या आहे. आठवडा बाजार एकाच छताखाली कसा आणता येईल, यासाठी पालिका प्रशासनाकडून सकारात्मक प्रयत्न केले जातील.
- पल्लवी पाटील, मुख्याधिकारी
फोटो : ०८ महाबळेश्वर फोटो
जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वरात गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यावर आठवडा बाजार भरत आहे.
लोगो : रस्त्यावरचा आठवडा बाजार - भाग ५