आत्मविश्वास ठरला महत्त्वपूर्ण : अलमास मुलाणी यांचे ७२ किलोमीटर सायकलिंग
आवड आणि धाडस अंगी असेल तर माणूस कोणत्याही क्षेत्रात कर्तबगारी दाखवतोच. पुरुषांच्या बाबतीत हे ठीक आहे. पण, महिलाही आता यामध्ये मागे नाहीत. त्याही विविध क्षेत्रात आपला नावलौकीक करत आहेत. अशाचप्रकारे साताऱ्यातील शिक्षिका अलमास मुलाणी त्यांनी ७२ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनी ७२ किलोमीटर सायकलिंग करून खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक दिन साजरा केला. साताऱ्यात सलग ७२ किलोमीटर सायकलिंग करणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या.
पुरुषांच्या बरोबरीनेच आज महिलाही विविध क्षेत्रात कर्तबगारी गाजवत आहेत. आवड, आत्मविश्वास आणि धाडस अंगी असेल तर हे शक्य होते. साताऱ्यात राहणाऱ्या अलमास अमर मुलाणी या कोडोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षिका आहेत. त्यांचे शिक्षण कोल्हापुरात झाले. त्यावेळी त्या विविध स्पर्धांमध्ये सहभाग घ्यायच्या. त्यामुळे खेळाची आवड होती. नोकरीनंतरही त्यांनी धावण्याचा सराव ठेवला. छंद व आरोग्य जपण्यासाठी त्यांनी दररोज धावणे सुरू केले. त्यामुळे आणखी आवड निर्माण झाली. यामधूनच त्यांनी सातारा हिल मॅरेथॉनमध्ये दोनवेळा सहभाग घेतला. महिलांच्या आपल्या गटात त्यांनी विजेतेपदही पटकावले. त्यांनी सांगली, गोवा, कोल्हापूर, माणदेश मॅरेथॉनमध्येही सहभाग घेतला आहे. छंद म्हणून त्यांनी हा सहभाग घेतला.
धावण्याचा छंद असतानाच लॉकडाऊनमध्ये त्यांनी सायकलिंग करण्यास सुरुवात केली. यातूनच त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला. अशातच ७२ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्ताने साताऱ्यात ‘अल्ट्रा प्राईड रन’चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सातारा शहरात ७२ किलोमीटर धावणे आणि सायकलिंग होते.
आपण करू शकतो, आपल्याकडे ते धाडस आणि आत्मविश्वासही आहे, हे ओळखून अलमास मुलाणी यांनी सायकलिंगमध्ये भाग घेण्याचे ठरवले. आपल्याबरोबर कोणी महिला सहभागी होतील का, याचाही त्यांनी विचार केला नाही. २६ जानेवारीला रात्री दीड वाजता त्यांनी साताऱ्यातील पोवई नाक्यावरून सायकलिंगला सुरुवात केली. यासाठी त्यांना मुलगा माहिरचा मोठा पाठिंबा मिळाला. त्यांनी पोवई नाका, राजपथ, मोती चौक, राजवाडा, मंगळवार तळे, परत मोती चौक, पोलीस मुख्यालयमार्गे पोवई नाका असे साडेपाच किलोमीटरचे अंतर पार केले. त्यांना अशा १४ फेऱ्या मारायच्या होत्या. रात्र असताना व बरोबर कोणीही नसताना त्यांनी सकाळी सहाच्या सुमारास ७२ किलोमीटरचे सायकलिंग पूर्ण केले. आपणही असे करू शकतो, हे त्यांनी पुन्हा सिद्ध करून दाखवले. एवढेच नाही तर सायकलिंग करून पुन्हा त्या शाळेतही गेल्या.
प्राथमिक शिक्षिका असणाऱ्या अलमास मुलाणी यांनी वयाच्या चाळीशीतही धाडसाने ७२ किलोमीटर सायकलिंग करून स्वतःबरोबर सातारकरांचाही नावलौकीक वाढवला आहे.
प्रतिक्रिया :
मला भीती घालवायची होती. धाडस करायचे होते. त्याचबरोबर आपण हे करू शकतो, हा आत्मविश्वास होता. त्यातच आपण ७२ वा भारतीय प्रजासत्ताक दिन वेगळ्या पद्धतीने साजरा करूया, असे ठरवून सायकलिंगमध्ये सहभाग घेतला. त्यामध्ये यशस्वी ठरले. पुढीलवर्षी या सायकलिंगमध्ये आणखी महिला सहभागी होतील, हा विश्वास आहे.
- अलमास मुलाणी, शिक्षिका
- नितीन काळेल
.........................................................................