पुसेगाव : काही काळ सुप्तावस्थेत गेलेल्या कोरोनाने पुन्हा फेब्रुवारी महिन्यात डोके वर काढले आहे. गेल्या महिन्याभरात राज्यात, जिल्ह्यात कोरोना वाढतो आहे. ग्रामीण भागात प्रसाराचा वेग तुलनेने जास्त होत चालला आहे. खटाव तालुक्यात मोठ्या बाजारपेठांची गावे नागरिकांच्या वाढत्या रहदारीने धोक्यात आली आहेत.
खटाव उत्तर भागातील सर्वांत मोठी बाजारपेठ असलेले पुसेगाव मात्र बिनधास्त सुरू आहे. त्यामुळे परिसरासह इतर तालुक्यांतील नागरिकही आता पुसेगावात खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहेत. नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या प्रशासन सैल झाले असून, गावपातळीवर तयार करण्यात आलेली कोविड पथके कुठे गायब झाली तेच नागरिकांना कळत नाही. वाढत्या कोविडमुळे प्रशासनाने तातडीने कोरोना रोखण्यासाठी पावले उचण्याची गरज असल्याची मागणी जनतेने केली आहे.
गेल्या वर्षभरात खटाव तालुक्यातील विविध गावांत कोरोनाबाधित रुग्ण सापडत गेले. रुग्णाची संख्या जशी झपाट्याने वाढत होती, तसा नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकत होता.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गेल्या काही महिन्यांपासून महसूल, पोलीस, आरोग्य व स्थानिक प्रशासन कोरोना रोखण्यासाठी जिवाची बाजी लावत होते. वारंवार सूचना करूनही लॉकडाऊनच्या काळात नागरिक योग्य ती काळजी घेताना दिसले नव्हते. मात्र सध्या तर पोलीस प्रशासनाने अंगच काढून घेतले असल्याचे दिसून येत आहे. कुठे तरी थातुरमातुर कारवाई करण्यापलीकडे कोविडला रोखण्यासाठी विशेष प्रयत्न होताना दिसत नाहीत. पुसेगावात तर ‘आओ जाओ - घर तुम्हारा’ अशीच परिस्थिती गावातील मुख्य चौकांत, बाजारपेठेत, किराणासह इतर दुकानांत दिसून येत आहे. पुसेगावात काही व्यापाऱ्यांनी केवळ व्यवसायासाठी नियम पाळत नाहीत. सध्या पुसेगावात पुन्हा एकदा तशीच परिस्थिती दिसून येत आहे. खटाव तालुक्यात प्रशासनाने बघ्याची भूमिका न घेता कडक कायदा राबविण्याची गरज दिसत आहे. पोलीस प्रशासनाने कडक भूमिका घेतली पाहिजे.
(चौकट)
कोरोनाची लस प्राधान्याने घ्यावी : डॉ. गुजर
खटाव तालुक्यात आतापर्यंत पाच हजारांवर कोरोनाबाधितांची संख्या झाली. त्यातील सुमारे पावणेदोनशे रुग्ण दगावले आहेत; तर चार हजारांवर रुग्णांची कोरोनातून सुटका झाली, तर काही रुग्ण अजूनही त्याच दुखण्यात अडकले आहेत. खटाव तालुक्यातील विविध गावांत सध्या दिवसेंदिवस रुग्ण ॲक्टिव्ह होत आहेत. जानेवारी महिन्यात ११० कोरोना रुग्ण होते; तर फेब्रुवारी व मार्च महिन्यांत कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. म्हणजे कोरोनावाढीचा आलेख चढता होत चालल्याचे स्पष्ट दिसत आहे. आजमितीला पुसेगाव कोविड सेंटरमध्ये ५४ कोरोनाबाधित रुग्णांवर, तर बऱ्याच होम क्वारंटाईन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत परिसरातील २,२३४ नागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहे. ४५ वर्षांच्या पुढील वय असणाऱ्या नागरिकांनी न घाबरता कोरोनाची लस प्राधान्याने घ्यावी, असे आवाहन पुसेगाव कोविड केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गुजर यांनी केले आहे.