सातारा : कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून मागे लागलेले समस्यांचे शुक्लकाष्ट काही थांबलेले नाही. अनेकांची आर्थिक घडी विस्कटली असून, दातृत्वाचा झराही आटू लागला आहे. त्यामुळे अनेक सामाजिक संस्था अडचणीत आल्या असून, अनाथ व निराधारांचे पालन-पोषण करायचे कसे? असा प्रश्न या संस्थांपुढे उभा ठाकला आहे.
कोरोनामुळे वर्षभरात अनेक बदल घडले. अनेकांचे रोजगार गेले. अनेकांना एक वेळच्या भाकरीसाठी संघर्ष करावा लागला. अशीच काहीशी अवस्था जिल्ह्यातील सामाजिक संस्थांचीदेखील झाली आहे. नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या आणि विविध कारणांनी एकाकी पडलेल्या समाजातील निराधार, वृद्ध व्यक्तींचा सांभाळ करणाऱ्या या संस्थांना निराधारांचा सांभाळ करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
जिल्ह्यातील सर्वच वृद्धाश्रम व निराधारांचा सांभाळ करणाऱ्या संस्था या बाहेरून मिळणाऱ्या मदतीवरच चालतात. शासनाकडून अशा संस्थांना कोणत्याही स्वरूपाची मदत मिळत नाही. कोरोना व लॉकडाऊनपूर्वी या संस्थांना दानशूर व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणात मदत मिळत होती. मात्र, मदतीचा हात कोरोनानंतर हळूहळू कमी होत गेला. सध्या या निराधारांचे पालन पोषण करताना संस्थाचालकांना अनेक अडचणी येऊ लागल्या आहेत. मावळतीकडे झुकणाऱ्या या ताऱ्यांना अधिक चांगल्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी समाजातील दानशूरांनी पुन्हा एकदा पुढे येण्याची गरज आहे.
(चौकट)
१. दानशूर व्यक्तींवर मदार
वाई तालुक्यातील वेळे येथे यशोधन चॅरिटेबल ट्रस्टचा आश्रम आहे. या आश्रमात चाळीस निराधारांचे पालन-पोषण केले जाते. शासनाचे कोणतेही अनुदान आश्रमास मिळत नसल्याने याचा संपूर्ण डोलारा हा दानशूर व्यक्तींवर अवलंबून आहे.
२. गरजा भागविताना कसरत
वर्षभरापासून दानशूरांची मदत कमी झाल्याने निराधारांचे उदरभरण, त्यांचे आरोग्य व इतर प्राथमिक गरजा भागविताना ट्रस्टला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
३. शासनाकडून मदत नाही
सातारा व म्हसवड येथील वृद्धाश्रमाची अवस्था काहीशी अशीच आहे. विनाअनुदानित असल्याने शासनाची दमडीही या आश्रमाला मिळत नाही. त्यामुळे दानशूर व्यक्तींवरच वृद्धाश्रमाची गाडी उभी आहे.
४. आर्थिक घडी विस्कटली
कोरोनाची झळ वृद्धाश्रमांना देखील बसली आहे. पूर्वीप्रमाणे आता मदतीचा ओघही कमी झाला आहे. त्यामुळे सेवाभावी संस्था व आश्रमांची आर्थिक घडी पूर्णतः विस्कटली आहे.
(कोट)
कोरोनामुळे दानशूर व्यक्तींकडून ट्रस्टला मिळणारी मदत कमी झाली आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून निराधारांचा सांभाळ करणे जिकिरीचे बनले आहे. शासनाकडून ट्रस्टला कोणत्याही स्वरूपात मदत मिळत नाही. त्यामुळे दानशूर व्यक्तींनी निराधारांसाठी मदतीचा हात पुढे करावा.
- रवी बोडके, अध्यक्ष, यशोधन ट्रस्ट
(कोट)
दानशूर व्यक्तींकडून पूर्वी सर्व प्रकारची मदत मिळत होती. मात्र, कोरोनामुळे हे प्रमाण आता कमी झाले आहे. निराधार व्यक्तींचा सांभाळ करणे, त्यांना आरोग्य सेवा पुरविणे सध्या कठीण बनले आहे. शासनाने पुढाकार घेऊन अशा संस्थांना सर्वतोपरी मदत करावी.
- विजय कदम, सामाजिक कार्यकर्ता
सोबत फोटो :