पळशी : मार्डी येथे मागील आठवड्यात रुग्ण वाढल्याने प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले होते. तरीही काही जण विनाकारण फिरत होते. त्यामुळे रविवारी विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. दिवसभरात जवळपास ८० जणांची तपासणी करण्यात आली. तपासणीत एकही बाधित आढळला नसल्याने दिलासा मिळाला आहे.
यावेळी नोडल अधिकारी सौरभ माने, डॉ. संदीप पोळ, सरपंच संगीता दोलताडे, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, पोलीस पाटील आप्पासाहेब गायकवाड उपस्थित होते.
आठवडाभरापासून मार्डी पूर्णपणे बंद आहे. ग्रामस्थ प्रशासनाच्या सूचनांचे पालन करीत आहेत. पण काही जण अद्यापही गावात फिरताना दिसत आहेत. येथील आपत्ती व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत अशा लोकांना वारंवार समज देत असूनही काही जण प्रशासनाच्या सूचनांकडे कानाडोळा करीत होते. त्यामुळे प्रशासनाने रविवारी विनाकारण फिरणाऱ्या ८० जणांची कोरोना तपासणी केली.
तत्काळ तपासणी केली जात असल्याने विनाकारण फिरणाऱ्यांना चांगलाच चाप बसला आहे. मागील काही दिवसापूर्वी मार्डी गाव परिसरात कोरोना रुग्णसंख्या जवळपास ४० पर्यंत पोहचली होती. त्यामुळे मार्डी गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने रुग्णसंख्या आटोक्यात आली. सध्या फक्त दोन रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने मार्डी गावातील लॉकडाऊन हटवावे, अशी मागणी ग्रामपंचायतीने प्रशासनाकडे केली आहे
फोटो
मार्डी ता. माण येथे विनाकारण फिरणाऱ्यांची तत्काळ कोरोना तपासणी करण्यात आल्याने फिरणाऱ्यांना चांगलाच चाप बसला आहे.