सदर बझार परिसरातील शासकीय विश्रामगृहात सेवा बजाविणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या पत्नीला काही दिवसांपासून अशक्तपणा जाणवत होता. या दाम्पत्याने केलेल्या स्वॅब चाचणीनंतर पत्नीला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. विश्रामगृहाच्या पिछाडीला असणाऱ्या निवासांमध्ये आठ कर्मचारी राहतात. पालिकेच्या आरोग्य विभागाने या कर्मचाऱ्यांची तत्काळ माहिती घेऊन त्याचे स्वॅब घेतले. दुपारी अडीचनंतर विश्रामगृहात कोविड रुग्ण आढळल्याच्या वृत्ताने हा परिसर तत्काळ निर्मनुष्य झाला.
सातारा सैनिक स्कूलचे इयत्ता दहावीचे तीन विद्यार्थी कोविडबाधित आल्याची माहिती समोर आली आहे. चौथ्या विद्यार्थ्याचा कोरोना टेस्टचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. हे विद्यार्थी आपल्या गावावरून नुकतेच निवासी शाळेसाठी परतले होते. शाळा व्यवस्थापनाने जी तपासणी मोहीम घेतली त्यामध्ये ही बाब समोर आली. या विद्यार्थ्यांची जिल्हा रुग्णालयातसुद्धा तपासणी करण्यात आली. संशयित चार विद्यार्थ्यांपैकी एकाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. कोविडबाधित विद्यार्थ्यांना तत्काळ क्वारंटाईन करण्यात आल्याचे सैनिक स्कूलचे प्राचार्य ग्रुप कॅप्टन अशोक आरगडे यांनी सांगितले.