सातारा : नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांची लाडावून ठेवलेले ठेकेदार आता पदाधिकाऱ्यांनाच डोईजड होऊ लागले आहेत. नगरपालिकेने दोन दिवसांपूर्वी घडलेल्या थप्पड नाट्यानंतर बुधवारी माजी नगराध्यक्ष सचिन सारस यांना एका ठेकेदाराने मुख्याधिकाऱ्यांसमोरच त्यांच्या दालनामध्ये धमकावले. प्रलंबित बिलावरून हा प्रकार घडल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. या दरम्यान सचिन सारस यांनी मात्र ठेकेदाराविरोधात कुठेही तक्रार केली नसल्याचे खात्रीशीर माहिती आहे.ठेकेदार प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी कमी; परंतु पालिकेत सातत्याने पडून असतात, ही बाब आता नवीन राहिली नाही. नगरसेवक तसेच पालिकेच्या अधिकाऱ्याशी जवळीक असल्यामुळेच काही ठेकेदारांचा रुबाब वाढला असून, ते आता थेट पालिकेच्या कारभारात हस्तक्षेप करू लागले आहेत. पालिका वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून ठेकेदारांच्या हस्तक्षेपाची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. पदाधिकारी तसेच अधिकाऱ्यांचे कान उपटण्यापर्यंत ठेकेदारांची मजल जाते, यावरून नगरसेवकांकडून कशा पद्धतीने कारभार सुरू आहे, हे नागरिकांना कुणी सांगण्याची गरज राहिली नाही. बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या दालनात एक ठेकेदार उपस्थित होता. दरम्यान, तेथे माजी नगराध्यक्ष सचिन सारस आले. त्यांना पाहताच ठेकेदाराची सटकली, ‘माझे बिल तुम्ही अडकवले आहे. बिल मिळाले नाही तर तुम्हाला दाखवतोच,’ अशा शब्दात सचिन सारस यांना ठेकेदाराने बापट यांच्यासमोरच धमकावले. या प्रकरणाची पालिका वर्तुळात दिवसभर खुमासदार चर्चा रंगली. (प्रतिनिधी) पालिकेत ठेकेदारांचे राज्यपालिकेत ठेकेदारांचे राज्य असून पदाधिकारी व कर्मचाऱ्यांकडून नव्हे तर ठेकेदारांकडूनच पालिकेचा कारभार हाकला जातोय, अशी चर्चा नागरिक करीत आहेत. पालिकेत मनोमिलनाची सत्ता असून दोन्ही आघाड्यांच्या काही नगरसेवकांच्या बेताल कारभारामुळे ठेकेदारांचा रुबाब पालिकेत वाढला आहे. पालिकेत सुरू असलेले या घटनांची माहिती नेत्यांच्या कानावर पडत नाही, की त्याकडे ते कानाडोळा केला जातोय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. नेत्यांचा वचक राहिला नसल्यामुळेच अशा प्रकारच्या घटना घडत असाव्यात, अशी शंका नागरिक उपस्थित करीत आहेत.
ठेकेदाराची चक्क पालिकेत अरेरावी!
By admin | Updated: November 21, 2015 00:24 IST