वेळे : पावसाळा चालू झाला तरी वेळे परिसरात पावसाची हजेरी लागत नव्हती; परंतु मंगळवारपासून पावसाची संततधार सतत सुरू असल्याने येथील शेतकरीवर्ग सुखावला असल्याचे दिसत आहे. त्यामुळे शेतकरीवर्गात आनंद निर्माण झाला आहे.
या हंगामातील पेरणी पूर्ण झाली. मात्र, पाऊस अचानक नाहीसा झाल्याने येथील शेतकरी चिंताग्रस्त झाले. पेरलेली पिके उगवून येतील की दुबार पेरणी करावी लागेल, या विवंचनेत शेतकरीवर्ग होता. आता मात्र पाऊस पडू लागल्याने संकट निश्चितच दूर झाले. पावसाच्या आगमनाने सर्व परिसर न्हाऊन निघाला असून, जमीनदेखील ओलीचिंब झाली आहे. या सततच्या संततधारेमुळे पिकांना संजीवनी मिळाली आहे.
बरेच दिवस पावसाने दडी मारल्याने या परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती; परंतु पावसाच्या आगमनाने येथील जनता सुखावली आहे, तसेच दुबार पेरणीच्या संकटातून शेतकरीवर्ग बाहेर पडला आहे.