जगदीश कोष्टीसातारा : सातारी कंदी पेढा म्हणून पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला जागोजागी तो विकला जातो. कंदी पेढ्याचे महाकाय फलक ग्राहकांना आकर्षित करत आहेत. सुपारी एवढा पेढा अन्, त्याचा हत्ताएवढा बोर्ड यामध्ये कंदी पेढा बदनाम होत आहे. सातारी कंदी पेढा हा बनविण्याची विशिष्ठ पद्धत आहे. त्याची विशिष्ट चव असते, ती मिळत नसल्याने ग्राहक खऱ्या पेढ्यापासून वंचित राहात असल्याचे साताऱ्यातील पेढे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.सातारी कंदी पेढा आणि मथुरा, कुंथलगिरी, नरसोबाची वाडी येथील पेढ्यांमध्ये साम्य आढळते. तरीही भाजणीची उत्कृष्ट पद्धत आणि फिक्केपणा तसेच मर्यादित गोडवा यामुळे सातारी कंदी पेढाच भारतामध्ये वरचढ आहे. सातारी कंदी पेढा हा खमंग भाजणीचा, खरपूस भाजलेला, मर्यादित गोडव्याबरोबरच वेलचीचा निसटता स्वाद देतो. कंदी भाजणीमुळे तोंडात पटकन विरघणारा पेढा हे सातारी कंदी पेढ्याचे वैशिष्ट्य आहे.
कंदी पेढा नाव कसे पडले
- पेढा तयार होताना जी खरपूस भाजणी असते, तिलाच कंदी नावाने ओळखलं जाते. ‘कंदी भाजणीचा पेढा’ अशी तुळजाराम मोदी यांची पूर्वी एअर इंडियाच्या विमानांमध्ये जाहिरात असायची.
- भाजणीमुळे जो मंद सुगंध पसरतो, त्यावरून कंदी भाजणीची चाचणी लक्षात येते. कंदी भाजणी हे एक कौशल्य आहे. म्हणूनच प्रत्येक दुकानातील पेढ्याच्या चवीमध्ये फरक आहे. खवा भाजणे, प्रमाणात साखर घालणे, ती विरघळली की, वेलची पेरणे हे कोणीही करू शकते.
- हीच कंदी भाजणी असा गैरसमज करून घेत असंख्य कंदी पेढ्यांचे व्यापारी तयार झालेत. मात्र, अस्सल कंदी भाजणी घेणे मोजक्याच पारंपरिक आणि खानदानी घराण्यांना जमते.
बनविण्याची पद्धत अत्यंत गोपनीयपूर्वी तुळजाराम मोदी, नारायणराव लाटकर, बी. एम. लाटकर, बाळप्रसाद मोदी, राजाराम मोदी हे स्वतः भल्या पहाटे शुचिर्भूत होऊन, देवपूजा करून सोवळ्यातच दूध घोटवायचे. त्याचा खवा बनवायचे, तदनंतर लगेच तो खवा मुस्त्याने घोटवत अस्सल कंदी पद्धतीने भाजत कुंदा मारायचे. यानंतरच कामगारांना कारखान्यात प्रवेश असायचा. त्यांचे काम फक्त पेढे हातावर वळत गोलाकार बनवून ताटात लावून दुकानामध्ये विक्रीला पाठवायचे असे.तुळजाराम मोदी यांची पाचवी पिढीराष्ट्रपतींच्या हस्ते गौरविले गेलेले दिवंगत तुळजाराम मोदी यांची पाचवी पिढी आज या व्यवसायात आहे. त्यांनी पेढे बनविण्याची पद्धत तशीच ठेवली आहे. त्यामुळे सातारकरांना अस्सल कंदी पेढा खायला मिळतो.
कच्चा मालाचा दर्जा घसरलासाताऱ्यातील कंदी पेढ्याचा उल्लेख कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या चरित्रात आढळतो. तसेच साताऱ्यातून परदेशात कंदी पेढा चंदनाची किंवा चांदीच्या पेटीतून पाठविला जात होता. सातारी कंदी पेढ्याची जाहिरात लंडनमध्येही झळकत असे, अशी माहिती करिश्मा मोदी यांनी दिली.
परराज्यातील लोकांनी या व्यवसायामध्ये उदरनिर्वाहासाठी प्रवेश केला. दर्जा टिकविण्यात त्यांना रस नसल्याने केवळ आर्थिक उन्नत्तीसाठी पेढ्यांमध्ये साखरी पेढा, दोन नंबर अशा क्वालिटी आल्या. त्यामुळे चवीचा दर्जा अजून खालावत गेला. - प्रशात मोदी (लाटकर) सातारा