कऱ्हाड : ‘तालुक्यातील दक्षिण मांड नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक कुटुंबांना फटका बसला आहे. अनेकांचे संसारोपयोगी साहित्य वाहून गेले आहे. त्याचे संसार पुन्हा उभे राहावेत, यासाठी काँग्रेस पक्षाच्यावतीने मदतीचा खारीचा वाटा त्यांना देऊ केला आहे. अशा अडीअडचणींना काँगेस पक्ष नेहमी पाठीशी राहील,’ असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
जिल्हा काँगेसच्यावतीने पूरग्रस्तांना ''एक हात मदतीचा'' या उपक्रमाद्वारे काले येथील १७० कुटुंबांना आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याहस्ते मदत देण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. काँग्रसचे सरचिटणीस व जिल्हा परिषद सदस्य ॲड. उदयसिंह पाटील, काँग्रसचे तालुका अध्यक्ष मनोहर शिंदे, प्रा. धनाजी काटकर, जिल्हा काँगेसचे सरचिटणीस नाना पाटील, बाजार समितीचे सभापती महादेव देसाई, नितीन थोरात, देवदास माने, काकासाहेब पाटील, किरण पाटील, संतोष पाटील, साहेबराव पाटील, विकास पाटील, काले टेक उपसरपंच अजित यादव, जयकर खुडे, संदीप यादव, प्रा. के. एन. देसाई, शशिकांत यादव, युवराज दळवी, अरुण पाटील, शंकर यादव, माणिक यादव, भगवान यादव, विलास यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या नुकसानीचा शासनाकडे पाठपुरावा तातडीने करण्यात आला. सरकारने पूरग्रस्तांच्या अडीअडचणी विचारात घेऊन कोट्यवधीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. सरकार नेहमीच पूरग्रस्तांच्या पाठीशी आहे त्याचबरोबर काँगेस पक्षाच्यावतीने पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला आहे. संसारोपयोगी साहित्य देऊन पक्षाच्यावतीने मदत केली जात आहे. कऱ्हाड दक्षिण विभागातील झालेल्या नुकसानीसाठीचा निधी उपलब्ध झाला असून, लवकरच कामे सुरू होतील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. राज्य काँग्रेस शिस्त कमिटीवर पृथ्वीराज चव्हाण यांची, तर ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा नाना पाटील मित्र परिवार व ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला. प्रतीक पाटील यांनी प्रास्ताविक केले. सतीश चव्हाण यांनी आभार मानले.
फोटो
काले (ता. कऱ्हाड) येथे काँगेसच्यावतीने पूरग्रस्तांना ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमाव्दारे संसारोपयोगी साहित्य वाटप करताना आमदार पृथ्वीराज चव्हाण, ॲड. उदयसिंह पाटील, नाना पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.