पाचवड : ‘ज्यांनी आयुष्यभर ज्ञानदान करून सेवापूर्ती केली. जे तरुण सेवाभावी वृत्तीने कार्यरत आहेत. त्यांचा एकत्र सन्मान करून साधलेला संगम अलौकिक आहे’, असे प्रतिपादन शिक्षण विभागाचे केंद्रप्रमुख व शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठल माने यांनी केले.
भुईंज येथे रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात सेवापूर्ती करणाऱ्या पाच जणांचा गौरव तसेच वि.रा. तथा बाबासाहेब जाधवराव प्रतिष्ठानतर्फे शिववंदनेश्वर प्रतिष्ठानला पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रयतचे जनरल बॉडी सदस्य भय्यासाहेब जाधवराव होते.
माने म्हणाले, ‘बाबासाहेब जाधवराव यांनी समाजाच्या प्रत्येक घटकासाठी योगदान देत अनेक माणसं, घरं उभी केली. त्यांनी घेतलेल्या परिश्रमाची फळं म्हणजे हे विद्यालय संपूर्ण रयत परिवारात ग्रामीण भागात प्रथम क्रमांकावर आहे. शिववंदनेश्वर प्रतिष्ठानचे इतिहास जपणुकीचे काम कौतुकास्पद व भावी पिढीसाठी प्रेरणादायी आहे.’
यावेळी उपमुख्याध्यापक पंडितराव यादव, भरती अहिरे, कुसुम जाधव, भारती खुंटाळे, राजाराम माने यांना गौरवण्यात आले. शिववंदनेश्वर प्रतिष्ठानला सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. दीपक पवार यांनी मानपत्राचे लेखन केले.
यावेळी नारायण शिंदे, उत्तमराव भोसले, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जगन्नाथ दगडे, सोसायटीचे उपाध्यक्ष रामदास जाधव, प्रेस क्लबचे अध्यक्ष राहुल तांबोळी, कृष्णात घाडगे उपस्थित होते. जयवंत पिसाळ यांनी स्वागत केले. प्राचार्या सुमन कदम यांनी प्रास्ताविक केले. स्नेहल सकुंडे, संगीता जाधव
यांनी सूत्रसंचालन केले. तात्यासाहेब लावंड यांनी आभार मानले.