गत २० वर्षांपूर्वी उत्तरमांड प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर गमेवाडीपासून उत्तरमांड धरणाच्या भिंतीच्या खालून जाळगेवाडी, चव्हाणवाडी, माथणेवाडी गावांकडे जाण्यासाठी नवीन रस्ता तयार करण्यात आला आहे. सध्या सांडव्या शेजारून जाणाऱ्या या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहने येथील खड्ड्यात अडकत आहेत. तर दुचाकीस्वार वाहनचालकांना येथे मोठी कसरत करावी लागत आहे. या कसरतीमध्ये अनेकजण पडून जखमी होत आहेत. याचा विचार करून या ठिकाणी खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून रस्ता नव्याने बनवावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
चाफळ गावातून जाळगेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी शासन एक कोटीच्यावर निधी खर्च करत आहे. मात्र, उत्तरमांड धरणाच्या सांडव्याशेजारील रस्त्यासाठी निधी देत नसल्याने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रकल्पासाठी जाळगेवाडी, माथणेवाडी येथील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी देऊ केल्या आहेत. मात्र त्यांच्यासाठी लोकप्रतिनिधींना साधा रस्ता बनवता येईना, ही शोकांतिका म्हणावी लागेल.
शासनाने तातडीने याची दखल घेऊन रस्ता खडीकरण व डांबरीकरण करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी तसेच ग्रामस्थांनी व जाळगेवाडीचे सरपंच शिवाजी काटे यांनी केली आहे.
- कोट
चाफळ ते जाळगेवाडी रस्त्याच्या खडीकरण, डांबरीकरण कामासाठी मंत्री शंभूराज देसाई यांनी एक कोटी निधी देऊ केला होता. गमेवाडीकडून धरणाजवळून येणाऱ्या रस्त्याच्या कामासंदर्भात मंत्री देसाईंच्या माध्यमातून शासन स्तरावर पाठपुरावा करणार आहे.
- भरत साळुंखे, अध्यक्ष
संजय गांधी निराधार योजना, पाटण तालुका
फोटो : ०६केआरडी०२
कॅप्शन : चाफळ विभागातील उत्तरमांड प्रकल्पानजीक असलेल्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, वाहने चालविताना चालकांना कसरत करावी लागत आहे. (छाया : हणमंत यादव)