मसूर : सहकार व पणनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून हेळगाव, ता. कऱ्हाड येथे राजे ग्रुप चौक ते कुंभार आळी या भागातील रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम मंजूर झाले होते. ते काम पूर्णत्वाकडे गेले आहे. या भागात रस्त्याची रुंदी कमी होती. त्यामुळे चारचाकी वाहन आल्यास अडथळा निर्माण होत होता. ग्रामपंचायतीने चौदाव्या वित्त आयोगातून रस्त्याच्या दोन्ही बाजूला काही दिवसांपूर्वी बंदिस्त गटार बांधली आहे. आता रस्त्याचे काम होत असल्याने रस्त्याची रुंदी वाढली आहे. त्याचबरोबर वाहनांना होणारा अडथळा दूर झाला आहे. हे काम होत असल्याने येथील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडी
मलकापूर : आगाशिवनगरात रस्त्यावरील पार्किंगमुळे नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे. नागरिकांनी याबाबत पोलिसांसह पालिकेकडे अनेक लेखी तक्रारी केल्या. या सर्व तक्रारीचा विचार करून पालिकेने अतिक्रमण हटविण्याचा विषय गांभीर्याने घेतला होता. कोल्हापूर नाका ते नांदलापूर हद्दीपर्यंत दोन्ही उपमार्गावर व कऱ्हाड ते ढेबेवाडी रस्त्यालगत अनेक विनापरवाना हातगाडे, वाहनातून रस्त्यांवरच व्यवसाय करत आहेत. काही ठिकाणी फूटपाथवर दुकाने तर रस्त्यावर पार्किंग होत असल्यामुळे अनेकवेळा वाहतूक कोंडी व अपघात घडले आहेत.
मंद्रुळकोळेमध्ये शतचंडी यज्ञास उत्साहात प्रारंभ
सणबूर : मंद्रुळकोळे, ता. पाटण येथे दरवर्षीप्रमाणे शतचंडी यज्ञाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या हस्ते या यज्ञास सुरुवात झाली. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच परिसरातील भाविकांची उपस्थिती होती. बुधवारी, दि. २७ सायंकाळी सात ते रात्री दहा या वेळेत होम-हवन होणार आहे.
मुख्य रस्त्याकडेला पुन्हा हातगाड्यांचे अतिक्रमण
कऱ्हाड : येथील बसस्थानक ते विजय दिवस चौक परिसरातील रस्त्याकडेला चायनीज, वडापाव तसेच फळविक्रेते व साहित्य विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. परिणामी विद्यार्थी व प्रवाशांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. कऱ्हाड पालिकेच्यावतीने काही महिन्यांपूर्वी अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली होती; मात्र पुन्हा पहिले पाढे पंचावन्न अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढलेल्या अतिक्रमणांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
कॅनॉल ते कॉलेजपर्यंत पादचारी मार्ग दुरवस्थेत
ओगलेवाडी : कृष्णा कॅनॉल ते कॉलेज रस्त्याकडेला असलेल्या पादचारी मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी कठडे ढासळले आहेत. तसेच त्याखालील नाल्यातील सांडपाणीही रस्त्यावरून वाहत आहे. सांडपाण्याची दुर्गंधी परिसरात पसरत आहे. याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. तसेच कृष्णा कॅनॉलपासून बनवडीपर्यंतचा रस्ताही दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
आगाशिवनगरला अंतर्गत रस्त्यात खड्ड्यांचे साम्राज्य
मलकापूर : आगाशिवनगरसह शहरात गटारालगत सांडपाणी वाहून जाण्यासाठी खोदाई करण्यात आली आहे. काम झाल्यानंतर ही चर बुजवण्याचे काम व्यवस्थित न केल्यामुळे प्रत्येक कॉलनीत प्रवेश करताना खड्डाच प्रत्येकाचे स्वागत करत आहे. तसेच केबलच्या कामासाठी उपमार्गावर खोदलेले व पावसाने पडलेले खड्डे धोकादायक बनले आहेत. जागोजागी खड्डे पडल्यामुळे नागरिकांसह वाहनचालक संताप व्यक्त करत आहेत. शहरातील अंतर्गत रस्त्यावर पडलेले हे खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.