सातारा : किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा प्रतापगड खंडाळा कारखाना आणि वाढते कर्ज - वाढता तोटा या विषयांभोवती फिरत राहिली. कधी नव्हे ते चेअरमन मदन भोसले हे बचावात्मक पवित्र्यात तर काही प्रश्नांच्या उत्तरात ते अगदीच अगतिक दिसले, अशी माहिती बाबूराव शिंदे राजेंद्र शेलार, बाबासाहेब कदम आणि धर्मराज जगदाळे यांनी दिली.
याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, कारखान्याच्या इतिहासात प्रथमच ही वार्षिक सभा ऑनलाईन झाली. कारखान्याचे सभासद बाबूराव शिंदे, राजेंद्र शेलार , बाबासाहेब कदम, धर्मराज जगदाळे आदींनी जवळपास दहा प्रश्न उपस्थित केले होते. सभा पत्रिकेतील विषय क्रमांक ८ नुसार भागीदारीत चालवण्यात येत असलेला खंडाळा कारखाना अन्य कुणाला चालवण्यास देण्याबाबतचा प्रश्न राजेंद्र शेलार यांनी उपस्थित केल्यानंतर चेअरमन भोसले यांनी कारखान्याच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीबाबत विशेषत: खंडाळा कारखान्यात गुंतवलेल्या पैशामुळे (एकशे वीस कोटी रुपये) किसन वीर अडचणीत आल्याची अप्रत्यक्षरीत्या कबुलीच दिली. खंडाळा कारखान्याच्या उभारणीत स्थानिक पातळीवरून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने ही परिस्थिती ओढावल्याचे सांगत किसन वीरने गुंतवलेले हे पैसे लवकर न मिळाल्यास तोही अडचणीत येईल ,हे लक्षात घेऊन खंडाळा साठी अन्य कुणाकडून मदत घेण्यात येत असल्याचे सांगितले.
प्रतापगड संदर्भात बाबूराव शिंदे यांनी विचारले, की आपण सोळा वर्षासाठी हा कारखाना चालवण्यास घेतला आहे. त्याला आता आठ वर्षे झाली. तो बंद का ठेवण्यात आलाय? यावर प्रतापगडच्या स्थानिक व्यवस्थापन - कामगारांची असहकाराची भूमिका कारणीभूत असल्याचे अध्यक्ष भोसले यांनी सांगितले. यावर प्रतापगड आणि आपल्यात नेमका करार काय झालाय, या कराराचे पालन आपल्याकडून होत नाही की त्याला प्रतापगडचे व्यवस्थापन जबाबदार आहे हे एकदा लोकांच्या समोर येऊ द्या.आणि तसं नसेल तर आपण यातून बाहेर का पडत नाही..? आपण चालवण्यास घेतल्यानंतर तो चालवता येत नसेल तर आपल्या मातृसंस्थेची प्रतिमा मलीन होतेच पण शिवाय त्याच्या कर्जाचा - व्याजाचा भुर्दंड आपल्याला सहन करावा लागत नाही का? आदी प्रश्नांची सरबत्ती झाल्यानंतर प्रतापगड बाबतही तोडगा काढण्याचे प्रयत्न साखर आयुक्तांच्या दरबारात सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.