सातारा : ‘जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत निवडलेल्या गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान व महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांच्या माहितीचा प्रचार व प्रसिद्धी जलदिंडीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे,’ अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात गुरुवारी जिल्हाधिकारी मुदगल यांच्या हस्ते पुष्पहार व श्रीफळ वाढवून जलदिंडी मार्गस्त केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील, प्रांताधिकारी रवींद्र खेबुडकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) पराग सोमण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, तहसीलदार राजेश चव्हाण, चंद्रशेखर सानप, जिल्हा कृषी अधीक्षक जितेंद्र शिंदे उपस्थित होते.मुदगल म्हणाले, ‘गेल्या वर्षीही अशाच प्रकारे जलदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. त्याला प्रत्येक गावांमधून चांगला प्रतिसाद मिळाला होता. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवारची कामे घेण्यासाठी मोठा उत्साह दिसत आहे. या जलदिंडीच्या माध्यमातून पाण्याच्या बचतीचे महत्त्व कळेल व जलसंधारणाच्या कामांसाठी ग्रामस्थ पुढे येतील.’मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील म्हणाले, ‘ग्राम उदय से भारत उदय’ अभियान १४ ते २४ एप्रिल याकालावधीत राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत केंद्र तसेच राज्याच्या विविध योजनांची माहिती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणार आहोत. तसेच या कालावधीत शेतकऱ्यांसाठीही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जलयुक्त शिवार अभियानातील कामे शास्त्रोक्त पद्धतीने करण्यावर भर दिला जाणार आहे. जलयुक्त शिवार अभियानांच्या कामामध्ये अंगणवाडी सेविका, महिला बचत गट यांचाही सहभाग वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.’ (प्रतिनिधी)
‘जलयुक्त शिवार’च्या प्रचारासाठी जलदिंड्या जिल्ह्यात रवाना
By admin | Updated: April 14, 2016 21:12 IST