वाठार स्टेशन
वाट पाहीन पण एसटीनेच जाईन, अशी ओळख असलेली सर्वसामान्य जनतेची लालपरी कोरोनानंतर आता रस्त्यावर धावू लागली आहे. मात्र अजूनही म्हणावं तसे प्रवाशी एसटीला मिळत नसल्याने अनेक मार्गांवरील एसटी बस या कमी प्रवाशांवर सुरू आहेत. अशी परिस्थिती असली तरी काही मार्गावर मात्र कोरोनाचे नियम पायदळी तुडवत एसटीतील प्रवास सुरु आहे.
सातारा जिल्ह्यात कोरोना अद्याप संपला नाही. केवळ थोडीफार शिथिलता देण्यात आली असताना एसटीमधील होणारी गर्दी कमी होणे गरजेचे आहे.
एसटीशिवाय रस्त्यावर धावणारी खासगी वाहतूक सध्या बंद आहे. त्यामुळे साताऱ्याकडे विविध कामांनिमित्त जाणाऱ्या प्रवाशीसंख्येत वाढ झाली आहे मात्र शासनाने जसे इतर वाहतुकीला कोरोनाबाबत नियम घालून दिले आहेत तसेच एसटीला नियम आहेत याचे भान राखणे गरजेचे आहे.
फलटण-सातारा या मार्गावर सकाळी साडेआठ वाजता फलटणकडून साताऱ्याकडे यायला एक बस आहे. ही बस वाठार स्टेशनमध्ये सव्वानऊ वाजता पोहोचते. त्यानंतर लगोलग दुसरी बस नसल्याने या बसला मोठी गर्दी असते. यासाठी फलटण आगाराने साडेआठनंतर साडेनऊ वाजता दुसरी बस सोडल्यास या रस्त्यावरील गर्दी आटोक्यात येईल. दोन दिवसांपूर्वी या बसमधून जवळजवळ साठ ते सत्तर प्रवाशांनी प्रवास केला. विशेष म्हणजे या प्रवासात कोरोनाचे सर्व नियम मोडीत काढण्यात आले.
एसटीवर केवळ मास्कशिवाय प्रवेश नाही, अशा जाहिराती करायच्या, मात्र एसटी सर्वांसाठी विनामास्क अशी परिस्थिती आहे.
एसटीत मास्क वापरणाऱ्या प्रवाशांना प्रवेशदारातच रोखावे तरच कोरोनाला रोखण्यात आपल्याला यश मिळेल, अन्यथा मागील दिवस पुन्हा येतील अशी परिस्थिती आहे. या बाबतीत एसटीने चालक, वाहक यांना सूचना करून एसटीतील गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत.