आजारांमध्ये वाढ
सातारा : वातावरणात सतत होणाऱ्या बदलामुळे सातारा शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून थंडी, ताप, सर्दी, खोकला या आजारांमध्ये वाढ झाली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालय तसेच शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाकडून साथरोग आटोक्यात आणण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ठिकठिकाणी धूर व औषध फवारणी सुरू करण्यात आली आहे.
व्हॉल्व्हला गळती;
पाण्याचा अपव्यय
सातारा : शहरातील जलवाहिन्यांना तसेच व्हॉल्व्हला काही ठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. समर्थ मंदिर, बोगदा, शनिवार पेठ व केसरकर पेठ परिसरातील व्हॉल्व्हला सातत्याने गळती लागत आहे. मात्र, पाणीपुरवठा विभागाने अद्याप दुरुस्तीचे काम हाती न घेतल्याने पाण्याचा अपव्यय सुरूच आहे. ही गळती तातडीने काढण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
वळवाच्या पावसाने
फुलझाडांना उभारी
सातारा : सातारा शहर व परिसरात सलग तीन-चार दिवस झालेल्या वळवाच्या पावसाने शाहू चौक ते रयत शिक्षण संस्था या दरम्यान असणाऱ्या दुभाजकामधील फुलझाडांना उभारी मिळाली आहे. दुभाजकामध्ये वाढलेले गवत व कचरा पालिकेच्या वतीने काढून टाकण्यात आला आहे. ही फुलझाडे पाण्याअभावी कोमेजून चालली होती. परंतु अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने फुलझाडांना नवसंजीवनी मिळाली आहे.
उपनगरांमध्ये
कचरा रस्त्यावर
सातारा : सातारा शहर हद्दीत पालिकेची घंटागाडी सकाळीच फिरत असते. ती अकरा वाजेपर्यंत कचरा गोळा करते; पण उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी दोन-दोन दिवस घंटागाडी फिरकत नाही. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावर कचरा टाकण्याशिवाय पर्यायच नाही. यामुळे अनेक भागातील रस्त्यावर कचऱ्यांचे ढीग साठलेले पाहायला मिळत आहेत. दुर्गंधीही सुटत असल्याने वेळीच विल्हेवाट लावणे गरजेचे आहे.