मसूर : खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नांमुळे खराडे येथील पुणे-मिरज-लोंढा या रेल्वे दुहेरीकरणाच्या इलेक्ट्रिकल लाईनच्या कामासाठी जात असलेल्या प्रकल्पबाधीत शेतकऱ्यांनी दिलेल्या लढ्याला यश आले. जमिनीची मोजणी पूर्ण होऊन भूसंपादन झाल्याने मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे खराडेतील शेतकऱ्यांनी श्रीनिवास पाटील, सारंग पाटील, विकास थोरात यांचे कौतुक केले.
खराडे येथील शेतकऱ्यांनी भूसंपादन होत नाही तोपर्यंत कोणतेही इलेक्ट्रिक लाईनचे काम मुरुमाचा भरावा, बांधकाम या गोष्टी करावयाच्या नाहीत, असा आक्रमक पवित्रा घेतला.
पुणे-मिरज-लोंढा या रेल्वे दुहेरीकरणाच्या इलेक्ट्रिकल लाईनचे काम बंद पाडले होते. या प्रकल्पाच्या भूसंपादनाचा प्रश्न खासदार श्रीनिवास पाटील व सारंग पाटील यांच्या सहकाऱ्याने तारगावचे विकास थोरात व कऱ्हाड, कोरेगाव, सातारा, खंडाळा तालुक्यातील रेल्वे प्रकल्पबाधित शेतकरी यांचा माध्यमातून भूसंपादन मोबदला व रेल्वेच्या इतर सुविधांसाठी न्यायिक लढा सुरू आहे. यामध्ये बऱ्यापैकी शेतकऱ्यांचे भूसंपादन प्रस्ताव तयार झाले असून, मोबदल्याचे पैसेही महसूलकडे आले आहेत. अजून काही रेल्वे लगतच्या गावातील शेतकऱ्यांचे प्रस्ताव महसूल प्रशासनाच्या व भूमी अभिलेखच्या माध्यमातून तयार करणे सुरू आहे. परंतु रेल्वे विभागाच्या चुकीच्या रेकॉर्डमुळे बऱ्याचवेळा याचा शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे खराडेच्या शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला होता.
आता झालेल्या मोजणीत पूर्वी आणि सद्यस्थितीतील रेल्वे लाईनला संपादित होणारे सर्व गट सामाविष्ट करण्यात आले. गावातील कवठे हद्द ते बेलवाडी हद्दीपर्यंतच्या सर्व गटांची संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे. खराडेच्या भूसंपादन प्रक्रियासाठी खासदार श्रीनिवास पाटील, सारंग पाटील यांच्या माध्यमातून विकास थोरात यांनी प्रयत्न केले. गावामध्ये रेल्वेने सतरा ते अठरा फूट रस्त्यासह संपादन केली. त्यामुळे शेतकऱ्यांना शासकीय हद्दीतून ये-जा करण्यासाठी कायमस्वरूपी रस्ता उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांमध्ये रस्त्याच्या बाबतीत भविष्यातील होणारे तंटे आपोआप सुटणार आहेत.
मोजणीवेळी विकास थोरात, रेल्वे अधिकारी बलवंत कुमार सिंग, मोजणी अधिकारी धसाडे, तलाठी जयसिंग जाधव, अविनाश जाधव, हणमंतराव जाधव, प्रकाश जाधव उपस्थित होते.
कोट
खराडेत रेल्वेसाठी गेलेल्या जमिनीसंदर्भात खासदार श्रीनिवास पाटील यांनी लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. शेतकऱ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न असलेली जमीन रेल्वे प्रकल्पात जाऊनही त्यांना योग्य न्याय मिळत नव्हता, तो मिळवून दिला.
- हणमंतराव जाधव,
शेतकरी खराडे