......
आरोग्यावर परिणाम
सातारा : बदलत्या हवामानामुळे सातारा व परिसरातील नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे दवाखाने हाऊसफुल्ल झाली आहेत. दुपारी कडक ऊन व सायंकाळी पाच वाजल्यानंतर थंडी पडत आहे. या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या शरीरावर होत असून, ताप, थंडी, सर्दी, खोकला आदी आजारांची लागण होत आहे.
......
गरजूंना रेशन कार्ड
सातारा : सातारा तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेकडून गरीब झोपडपट्टीवासीयांना रेशनकार्ड वाटप करण्यात आले. तहसीलदार आशा होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा निरीक्षक संतोष दळवी यांनी संबंधित कार्डधारकांना मदत केली.
....
वातावरणात बदल
सातारा : हवेची चक्रिय स्थिती निर्माण झाल्याने खटाव तालुक्यातील वातावरण चांगले बदलले आहे. सायंकाळनंतर पहाटेपर्यंत कडाक्याची थंडी तर दिवसा उन्हाचा तडाखा बसत असल्याने लोक आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. विविध रुग्णालयांमध्ये सर्दी, खोकला आणि तापाने फणफणलेल्या रुग्णांची गर्दी दिसून येत आहे.
......
बेशिस्त पार्किंग
सातारा : खटाव तालुक्याची मुख्य बाजारपेठ असणारे वडूज शहर. त्यामुळे येथे विविध लहान-मोठ्या व्यवसायासह दुकानांची मोठी रेलचेल. मात्र येथील व्यावसायिकांना दुचाकी, चारचाकी वाहनांच्या पार्किंगच्या समस्येने चांगलेच ग्रासले आहे. दुकानासमोर ग्राहकांऐवजी वाहनांची अधिक गर्दी दिसून येत आहे.
........
समस्यांच्या विळख्यात
पुसेगाव : येथील विविध भागांतील वसाहती समस्यांच्या विळख्यात सापडलेल्या आहेत. गावातील प्रभाग क्रमांक १ मधील जमादार वाडा, हवेली परिसरात गटारांची सोय नसल्याने नागरी वस्तीत सांडपाणी साचत आहे. त्यामुळे घरात घराच्या आजूबाजूला लहान डबकी तयार होऊन दुर्गंधी पसरत आहे. आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
.......
दुरुस्तीच्या कामांना वेग
सातारा : येथील नाट्यप्रेमींच्या रेट्यामुळे शाहू कला मंदिराच्या दुरुस्तीच्या कामाला वेग आला असून, पंधरा दिवसांत हे काम पूर्ण करण्याच्या सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्या आहेत. गेल्या वर्षभरापासून दुरुस्तीच्या कामासाठी शाहू कला मंदिर बंद आहे.
......
विद्यार्थी अस्वस्थ
मायणी : पाचवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू झाले; मात्र विनासुटी सलग अध्यापनाच्या तासिका होत आहेत. त्यामुळे पॉकेटमनी खर्च करून खाऊ खाण्यास व मैदानावर खेळण्यास मिळत नसल्याने विद्यार्थी अस्वस्थ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शाळेच्या वेळापत्रकात छोट्या व मोठ्या सुटीचे प्रयोजन करण्याची मागणी विद्यार्थी व पालक करीत आहेत.
.....
शिवारात हुरडा पार्टी
खटाव : गोवऱ्यांची शेकोटी त्यातील निखाऱ्यावर खरपूस भाजलेली ज्वारीची कोवळी दाणेदार कणसे आणि मग हातावर किंवा दगडावर घुसळल्यानंतर तयार होणारा गरमागरम हुरडा, गूळ, लसणाच्या चटणीसोबत चाखत रंगलेल्या गप्पांच्या छान मैत्री, असे चित्र खटाव तालुक्यातील शेत शिवारात दिसू लागले आहे.
........
गावोगावी जनजागृती
सातारा : सध्या वातावरणात बदल होत असल्याने साथ रोग पसरत आहेत. या रोगांपासून नागरिकांचा बचाव होण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत प्रशासन यांच्याकडून दक्षता घेण्यात येत आहे. नागरिकांनी आपापल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.