सातारा : सातारा पालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियानांतर्गत शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तसेच पाणीबचत मोहिमेंतर्गत ४२ नळांना तोट्या बसविण्यात आल्या. या मोहिमेत नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतल्यास पाणी वाया घालवणाऱ्या नागरिकांना गुलाब पुष्प देण्याची वेळ येणार नाही, असे मत पाणीपुरवठा सभापती सीता हादगे यांनी व्यक्त केले.
नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, आरोग्य सभापती अनिता घोरपडे, माजी उपनगराध्यक्ष राजू भोसले यांच्या उपस्थितीत सोमवारी पहाटे प्रभाग क्रमांक १ मधून स्वच्छता मोहीम व पाणी बचाव मोहीम राबवण्यात आली. यावेळी सभापती सीता हादगे यांनी नागरिकांशी संवाद साधला.
हादगे पुढे म्हणाल्या, उन्हाळा दोनच महिन्यांवर येऊन ठेपल्यामुळे आपल्या सर्वांना पाणी बचतीचे धोरण अवलंबावे लागणार आहे. सातारा शहरातील बहुतांश नळांना तोट्या नसल्याच्या तक्रारी प्राप्त होताच खासदार उदयनराजे भोसले, नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सभापती अनिता घोरपडे यांच्या सहकार्याने शहरात माझी वसुंधरा अभियानअंतर्गत स्वच्छता मोहीम व पाणी बचाव मोहीम हाती घेण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी शहरातील एकूण तोट्या नसलेल्या ४२ नळांना तोट्या बसवण्यात आल्या.
(चौकट)
नळ कनेक्शन कायदेशीर करावे
शहरातील ज्या नागरिकांची नळ कनेक्शन बेकायदेशीर आहेत, त्यांनी तत्काळ आपले कनेक्शन कायदेशीर करून घ्यावे. शहरात जेथे-जेथे नळाला तोट्या नाहीत, पाईपलाईनमधून पाणी गळती होत असल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ याची माहिती द्यावी. नळांना तोट्या बसविण्यासह तत्काळ गळती काढण्याचे काम हाती घेतले जाईल. नामदेववाडी झोपडपट्टी येथील महिलांशी पाणी बचतीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली असून, पाणी कसे वाचवावे, यासंदर्भात प्रबोधन करण्यात आले.
फोटो : ०२ सातारा पालिका
सातारा पालिकेने शहरात सोमवारपासून स्वच्छता व पाणीबचाव मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत शहरातील नळांना तोट्या बसविण्यात आल्या. तसेच प्रभाग १मधील नाल्यांची स्वच्छता करण्यात आली.