सातारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे बाधित होण्याचे प्रमाण १० टक्क्यांच्या आत आल्यामुळे जिल्ह्यात लॉकडाऊनला शिथिलता दिली आहे. नागरिकांनी गाफील न राहता बाजारपेठेमध्ये गर्दी करू नये, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून स्वत:ला व दुसऱ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
जिल्ह्यातील कोरोनासंदर्भातला आढावा पालकमंत्री पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात घेतला. या वेळी त्यांनी जनतेला आवाहन केले. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
प्रत्येक नागरिकाने घराबाहेर पडताना मास्कचा वापर, सुरक्षित अंतर पाळले पाहिजे व वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे, असे आवाहन करून पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले, जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळण्याची संख्या कमी झाली आहे. कुणीही कोरोना गेला असे समजू नये. प्रत्येकाने दक्षता घेतली पाहिजे. लग्न समारंभामध्ये मास्कचा वापर केला जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच लग्न समारंभात फोटो काढताना मास्क घालत नाहीत यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. लग्न समारंभातील उपस्थितांनी मास्कचा वापर करावा, असे आवाहनही पालकमंत्री पाटील यांनी केले आहे.
फोटो ओळ : सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सोमवारी कोरोना आढावा बैठक घेतली.