वाई : स्वच्छतेचे दूत म्हणून कितीही मोठे ब्रँड अॅम्बॅसिडर राष्ट्रीय स्तरावर उतरले असले तरी वाईतील बच्चे कंपनीने या सर्वांवर कढी केली आहे. स्वच्छतेचे महत्त्व कुंचल्यातून आणि लेखणीतून व्यक्त करत त्यांनी कृष्णामाई प्रती आपली आस्था प्रदर्शित केली.देशात नदी स्वच्छता व सार्वजनिक स्वच्छतेचे अभियान मोठ्या प्रमाणावर हाती घेतले आहे़ देशाच्या नद्या व नैसर्गिक जलस्त्रोत हे प्रदूषणाच्या विळख्यात आहेत़ त्यामुळे याचा दुष्परिणाम पर्यावरणावर व मानवी जीवनावर होत आहे़ नद्या या जीवनदायिनी असून, त्या प्रदूषणापासून वाचाव्यात यासाठी व्यापक जनजागृतीची गरज आहे, हा दृष्टिकोन समारे ठेवून ‘स्वच्छ वाहते कृष्णामाई’ अभियान हे तालुक्यातील स्वच्छ वाहते कृष्णामाई मंच मार्फत हाती घेतले आहे. या अभियानाअंतर्गत आज (शुक्रवारी) वाई तालुक्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयी जागृती व्हावी, तसेच पाण्याचे स्त्रोत दूषित होऊ नयेत, यासाठी जाणीवपूर्वक कार्य करण्याची वृत्ती अंगी निर्माण व्हावी, व या संदर्भातील विद्यार्थ्यांचे विचार, कल्पना, मनातील भावना चित्र व निंबध रूपाने प्रगटित झाल्या.यामध्ये तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील वीस हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला मंचच्या वतीने विविध शाळांना आज स्पर्धेनिमित्त भेटी दिल्या. स्पर्धामधील विविध गटांतून प्रथम पाच क्रंमाकांच्या यशस्वी विद्यार्थ्यांना, शाळांना लवकरच याचे आयोजन करून मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात येणार आहे़ याविषयीची माहिती विद्यार्थ्यांना शाळेमार्फत देण्यात येईल अशी माहिती मंचचे वीरेंद्र जमदाडे, अनिल सपकाळ, दिलीप जाधव, राजू गायकवाड, भवरलाल ओसवाल, डॉ़ विद्याधर घोटवडेकर, संजय धेडे यांनी दिली़ (प्रतिनिधी)स्वच्छ वाहते कृष्णामाई मंचच्या वतीने सुरू केलेले अभियान हे विद्यार्थ्यांना वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेचे बाळकडू लहान वयातच देईल व स्वच्छ भारत अभियान खऱ्या अर्थाने यशस्वी हाईल़ - योगेश परचुरे, प्राचार्य ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल, वाई
चिमुकल्यांनाही आस स्वच्छ कृष्णामाईची !
By admin | Updated: February 7, 2015 00:09 IST