सचिन काकडे
सोशल मीडियामुळं अख्खं जग आपल्या मुठीत आलं आहे. एका क्षणात आपल्याला जगाच्या काना-कोपऱ्यातील इत्यंभूत माहिती, फोटो, व्हिडीओ सर्व काही घरबसल्या मिळत आहे; परंतु सोशल मीडियाचा किती व कसा वापर करावा, त्याचे फायदे, तोटे, धोके या बाबींकडे आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहोत. त्यामुळे हल्लीची तरुणाई सोशल मीडियाच्या इतकी आहारी गेली आहे की, त्यांना त्याचं व्यसनच जडलं आहे. ‘एकवेळ जेवण नसलं तरी चालेल, पण मोबाईल हवा’ अशी मानसिकता तरुणाईची झाली आहे.
आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला असून, शरीराला जसा ऑक्सिजन लागलो, तशीच हल्लीच्या तरुणाईची सोशल मीडिया ही प्राथमिक गरज बनली आहे. लहान मुले असो किंवा किशोरावस्थेतील मुले, त्यांच्यावर सोशल माध्यमांचे अनेक चांगले-वाईट दुष्परिणाम दिसू लागले आहेत. काही तरुणाई सोशल मीडियाच्या माध्यमातून करिअरच्या नव्या वाटा शोधत आहे. जगातील विविध ठिकाणं, तिथली संस्कृती, शिक्षण पद्धती व कामाच्या वाटा पाहात आहे. नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून आपल्या आवडी-निवडी, छंद जोपासत आहे. इतकंच काय, तर डिजिटल साक्षरही होऊ लागली आहे. मात्र, दुसरीकडे काही मुले व तरुणांसाठी सोशल मीडिया केवळ गप्पा मारण्याचं किंवा फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्याचं माध्यम बनला आहे. याचा आपल्या रोजच्या आयुष्यावर किती व कसा परिणाम होत आहे, याचे भानही तरुणाईला नाही.
टीव्हीवरील कार्टूनमध्ये अनेकदा हिंसा, आक्रमकता दाखवली जाते. व्हिडीओ गेम्स तर मुलांना जास्तीत-जास्त अपघात घडवा, जास्तीत-जास्त शत्रूंना मारा, असे आव्हानच देतात. यातून मुलांमधील आक्रमकता वाढत आहे. चित्रपटांमध्ये हिंसेबरोबरच लैंगिक अत्याचारही सहजपणे दाखवले जातात. चित्रपटात मोठ-मोठ्या गप्पा मारणारा, हाणामारी करणारा, महागडे कपडे, गॉगल, शूज घालून मिरवणारा, सिगारेट ओढणारा हिरो देखील तरुणांना आकर्षण वाटतो. मग त्याच्याप्रमाणे राहण्याची, बोलण्याची त्यांना सवय जडते. हल्ली वेबसिरीजने सोशल मीडिया हायजॅक केला आहे. सर्वच वेबसिरीज अश्लील असतात असं नाही; परंतु काहींमधील संवाद, शिव्या, नको तितकं स्पष्ट बोलणं आणि दाखवणं तरुणांचं मन विचलित करीत आहे. बहुतांश तरुण लपून-छपून पोर्न व्हिडिओ देखील पाहतात. असे व्हिडिओ पाहणाऱ्यांची व ऑनलाईन सेक्स चॅट करणाऱ्यांची संख्याही अलीकडे वाढू लागली आहे. त्यामुळे सोशल मीडिया जितका चांगला तितकाच तो परिणामकारकही आहे. त्याच्या आहारी जाऊन नको ती पावले उचलली, तर आयुष्याची राखरांगोळी व्हायला वेळ लागणार नाही, हे विसरुन चालणार नाही.
(चौकट)
सर्व्हे सांगतो... मुलं काय पाहतात
कार्टून ५ %
अभ्यास ९ %
बीटीएस, डीआयवाय : १६%
माहिती तंत्रज्ञान, चालू घडामोडी : १५ %
वेबसिरीज : २४ %
अश्लील व्हिडीओ, व्हर्च्युअल सेक्स चॅट ३१%
(चौकट)
पालकांनी काळजी घ्यावी...
सोशल मीडियाच्या अती आहारी जाऊन अनेक मुले, तरुण सायबर क्राईमकडे वळू लागली आहेत. यामध्ये स्वत:चे व कुटुंबाचे कधीही भरून न येणारे नुकसान होत आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याच्या बाबतीत अधिक सजग असायला हवे. चांगल्या, वाईट गोष्टींबाबत त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारायला हव्यात. आपण काय करतोय, काय करायला हवं, आपलं भविष्य याची जाण मुलांना करून द्यायला हवी.