सातारा : शासनाने राज्याचा अधिकाधिक विकास करण्यावर भर दिला आहे. या विकास प्रक्रियेत आपल्या जिल्ह्याला अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध असून जिल्ह्याच्या समातोल विकासावर भर राहणार आहे, अशी ग्वाही देऊन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी प्रजासत्ताक दिनाच्या जिल्ह्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या.
छत्रपती शाहू क्रीडा संकुलात प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते. ध्वजवंदनानंतर परेड कमांड बाळासाहेब आलदार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्यांना मानवंदना दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
अख्ख जग कोविड १९ च्या विळख्यात अडकलं होतं. आता विळखा थोडा सैल झालाय, पण धोका अजून संपलेला नाही पण मागच्या सात आठ महिन्यात शासनाने वेळोवेळी घेतलेले निर्णय, लोकांनी दाखवलेला संयम आणि जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनातले अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या कामाचं कौतुक केले.
पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना गोपनीय क्षेत्रात, गडचिरोली जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री यांचे असाधारण आसूचना कुशलता पदक देऊन गौरव केला आहे. त्याचबरोबर पोलीस विभागातील अधिकाऱ्यांनाही राष्ट्रीय सुधार सेवा पदक व प्रमाणपत्र, गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलीस पदक तसेच आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचा कोविड वॉरियर्स म्हणून गौरव करण्यात आला.
कलापथकाद्वारे कोरोना संसर्गाविषयी जनजागृती
जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील आठवडी बाजारांमध्ये कलापथकाद्वारे कोरोना संसर्गाविषयी जनजागृती करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमानंतर लोककलारंग संस्थेमार्फत कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थितांनी उत्स्फूर्त अशी दाद दिली. जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम स्तुत्य असून यातून कोरोना संसर्गा विषयी ग्रामीण भागातील जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होईल, असा विश्वास पालकमंत्री पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.