फोटो झेडपीचा...
नितीन काळेल
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही जिल्हा परिषद सदस्यांना सभापतीपदाचे वेध लागले असून, त्यांनी वरिष्ठ नेत्यांच्या कानीही भावना पोहोचविली आहे. त्यातच वरिष्ठांनीही सकारात्मकता ठेवत पक्ष नेतृत्वाशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. परिणामी सभापती बदलाचा चेंडू नेत्यांच्या कोर्टात पोहोचलाय.
जिल्हा परिषदेची निवडणूक जानेवारी २०१७ मध्ये पार पडली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ४० हून अधिक सदस्य निवडून आले. बहुमत मिळाल्यामुळे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आली. पहिल्या अडीच वर्षांचा कार्यकाल संपल्यानंतर १ जानेवारी रोजी २०२० ला अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक झाली. त्यानंतर ९ जानेवारी रोजी सभापतींची निवड झाली; पण त्यापूर्वी झेडपी अध्यक्षांच्या बंगल्यावर राज्य विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यासह पक्ष नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर कृषी सभापतीसाठी मंगेश धुमाळ, महिला व बालकल्याणसाठी सोनाली पोळ आणि समाजकल्याणसाठी कल्पना खाडे यांचे नाव जाहीर झाले. यामुळे दावेदार नाराज झाले. काहींनी तर स्पष्ट शब्दांत नाराजी बोलून दाखविली. त्यामुळे रामराजेंनी दावेदारांची समजूत घालत एक वर्षासाठी सभापतीपदे असल्याचे स्पष्ट केले. तेव्हा कुठे नाराजीनाट्य संपले. त्यामुळे पक्ष बैठकीत ठरल्याप्रमाणे विद्यमान सभापतींची मुदत संपली आहे. त्यामुळे इच्छुकांनी देव पाण्यात घातले आहेत.
मागील महिन्यापासून हे इच्छुक आपापल्या नेत्यापर्यंत इच्छा बोलून दाखवीत आहेत. आतापर्यंत ग्रामपंचायत निवडणुकीचे कारण सांगून नेत्यांनी थांबायला सांगितले होते. ग्रामपंचायत निवडणूक पार पडल्याने काही इच्छुकांनी पुन्हा राष्ट्रवादीच्या वरिष्ठांच्या कानावर पुन्हा सभापतीपदाची संधी देण्याबाबत आर्जव केले आहे. त्यावर वरिष्ठांनीही पक्ष नेतृत्वाशी चर्चा करून योग्य निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले आहे. अशाप्रकारे इच्छुकांना आश्वस्त केले असले तरी पक्षनेतृत्व काय भूमिका घेणार, यावरही सभापतीपद बदलाचे वारे फिरणार, हेही तितकेच खरे आहे.
चौकट :
दिलेल्या शब्दांचे काय ?
इच्छुक पुन्हा घेणार भेट..
वर्षभरापूर्वी दावेदारांना नेत्यांनी सभापतीपद देण्याचा शब्द दिला होता. या शब्दाचे काय असा सवाल इच्छुक खासगीत करीत आहेत. आमची ताकद, काम असतानाही
डावलले तर चुकीचा संदेश जाईल, अशी भावनाच त्यांच्यात निर्माण झाली आहे. त्यातच हे इच्छुक दोन-तीन दिवसांत पुन्हा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार आहेत. त्यावेळी पुढील चित्र स्पष्ट होईल.
.....................................................