लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा बॉम्बे रेस्टॉरंट येथे दिल्लीत किसान आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी साताऱ्यातील विविध संघटनांनी सातारा कोरेगाव रस्त्यावर चक्का जाम आंदोलन केले. यावेळी जो जो व्यक्ती अन्न खातो, त्यांनी किसान आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आव्हान आंदोलकांनी केले.
दुपारी बारा वाजता येथील बॉम्बे रेस्टॉरंटजवळ विविध संघटनांचे कार्यकर्ते जमा झाले. यामध्ये सातारा जिल्हा महिला संघटना, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय काँग्रेस महिला आघाडी या संघटनांचा सहभाग होता.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी संघटनांनी चक्का जाम आंदोलन पुकारले होते. याला प्रतिसाद देत साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट येथे संघटनांनी शनिवारी सातारा-कोरेगाव रस्त्यावर चक्का जाम केले होते. यावेळी आंदोलकांमध्ये शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, जिल्हा महिला संघटनेच्या ॲड. वर्षा देशपांडे सामील झाले होते.
यावेळी बोलताना संघटनेने विविध संघटनेचे कार्यकर्ते म्हणाले, दिल्लीच्या सीमेवर दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यावर तोडगा न निघाल्यामुळे शेतकरी संघटनांनी आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार देशव्यापी चक्का जाम आंदोलन शनिवारी करण्यात येत असून त्याचा एक भाग म्हणून साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात हा रास्ता रोको करण्यात आला आहे. केंद्र शासनाने तीन कायदे रद्द केले नाहीत तर आंदोलन पुढेही चालूच राहणार असून, यापुढे ते तीव्र करण्यात येणार आहे. केंद्र शासन याला पूर्ण जबाबदार राहील. दरम्यान, आजच्या आंदोलनासाठी सकाळपासूनच या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यामध्ये तीस पोलीस कर्मचारी, ‘आरसीएफ’चे एक पथक आणि चार वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचा समावेश होता.
आंदोलनावेळी मोदी सरकारविरोधात आंदोलनकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. महिलांनी साखळी करून रास्ता रोको केला. जवळपास १५ मिनिटे रास्ता रोको झाल्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर या ठिकाणी ठप्प झालेली वाहतूक सुरळीत करण्यात आली.
फोटो ओळ : सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकामध्ये विविध संघटनांच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले. (छाया : जावेद खान)