प्रगती जाधव-पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : स्त्रियांमधील कर्करोगाची आकडेवारी पाहता राज्यात स्तनांच्या कर्करोगानंतर गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून येते. धूम्रपान, कमी वयात शारीरिक संबंध, एकापेक्षा जास्त व्यक्तीशी संबंध असणे, वर्षानुवर्षे गर्भरोधक गोळ्या खाण्याने हा आजार उद्भवत असल्याचे तज्ञ्ज्ञांचे मत आहे.
गर्भाशय मुखाचा कर्करोगात कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. कर्करोगपूर्व किंवा कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात इमेजिंग तंत्रज्ञानातही हा आजार कळून येत नाही. त्यामुळे गर्भाशयाचा कर्करोग भारतीय स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. हा कर्करोग ‘ह्युमन पॅपिलोमा व्हायरस’ या इन्फेक्शनमुळे होतो. ह्याचे निदान नियमित ‘पॅप स्मियर’ नामक परीक्षणाद्वारे करता येते. याचे निदान करण्यासाठी केल्या जाणाऱ्या पॅप स्मिअर चाचणीत रुग्णाला पाठीवर झोपवून स्पेकलमच्या साह्याने गर्भाशयाची तपासणी केली जाते. हा आजार किंवा इतर काही समस्या आहे का, हे तपासण्यासाठी गर्भाशयाच्या काही पेशी खरवडून काढल्या जातात आणि त्यांना मायक्रोस्कोपखाली तपासले जाते. ३० वर्षांहून अधिक वय असलेल्या तसेच लैंगिकरित्या सक्रिय असलेल्या महिलेने दर ३ वर्षांनी पॅप स्मिअर चाचणी करून घेण्याचा सल्ला दिला वैद्यकीय तज्ज्ञ देतात.
पेशींच्या बदल किंवा उत्क्रांतीवर लक्ष ठेवण्यासाठी अशा क्रियांमध्ये दुसऱ्या पॅप चाचणीचा समावेश होतो. वैकल्पिकरित्या, त्यात ‘कोलपोस्कोपी’ नावाची प्रक्रिया समाविष्ट असू शकते. ज्यामध्ये डॉक्टरांनी सूक्ष्मदर्शकासारखे साधन वापरून आपल्या गर्भाशय ग्रीवाची पाहणी करून तपासणी केली पाहिजे. यामुळे निरूपद्रवी किंवा कर्करोगाच्या जखमांचे प्रमाण वाढेल. चिंताजनक बाब आढळल्यास वैद्यकीयतज्ज्ञ त्या भागाची बायोप्सीही करण्याचा सल्ला देतात.
कोट
गर्भाशयाचा कर्करोग अनेकदा शेवटच्या टप्प्यातच समोर येतो. हा टाळायचा असेल तर वेळच्यावेळी तपासणी करणं आवश्यक आहे. याबाबत महिलांमध्ये जागरूकता होणं हेही खूपच महत्त्वाचे आहे.
- डॉ. तेजल गोरासिया, स्त्री कर्करोग तज्ज्ञ, ऑन्कोलाईफ, सातारा
चौकट :
१. ही काळजी घ्याच!
गर्भाशयाचा कर्करोग टाळण्यासाठी सुरुवातीपासून खबरदारी घेणे योग्य ठरते. याकरिता सुरक्षित यौनसंबंध असणे गरजेचे आहे तसेच दर दोन वर्षांनी पॅप स्मियर टेस्ट करविणे आवश्यक आहे. यामुळे रोगाचे वेळेत निदान करणे सोपे होते. ज्या महिला धूम्रपान करत असतील, त्यांनी धूम्रपानावर नियंत्रण ठेवायला हवे. कारण धूम्रपानामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होत असते. आपला आहार चौरस असावा. तसेच नियमित व्यायाम करावा.
२. कसा होतो हा कर्करोग
गर्भाशय मुखाच्या पेशी जास्त वाढल्याने गर्भाशय मुखाचा कर्करोग होतो. या पेशी आजूबाजूच्या अवयवांपर्यंत पोहोचू शकतात. सुरुवातीला या कॅन्सरची काहीच लक्षणे दिसत नाहीत. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग वाढला तर लक्षणं दिसायला लागतात. गर्भाशयाचा कर्करोग हा हळूहळू वाढणारा कर्करोग आहे त्याचे वेळीच निदान झाल्यास उपचार करणे सोपे होते.