कातरखटाव : बोंबाळे, ता. खटाव येथील स्मशानभूमी शेडची बिकट अवस्था झाली आहे. बऱ्याच वर्षांपासून या शेडकडे बोंबाळे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्यामुळे आता ढासळतंय का, मग ढासळतंय, अशी अवस्था झाली आहे.या स्मशानभूमीजवळ असणाऱ्या शेडला मोठे भगदाड पडले असून, अंत्यसंस्कार विधीला येणाऱ्या ग्रामस्थांना निवारा तर नाहीच; पण या शेडपासून लांब थांबावे लागत आहे. ‘सावधान पुढे धोका आहे? असा फलक लावण्याची वेळ ग्रामस्थांवर येऊन ठेपली आहे. बोंबाळे येथील शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाताना सावधानता बाळगायला लागत आहे. प्रत्येकाच्या शेतात जाणारा रस्ता या शेडजवळूनच जात असल्यामुळे धोका निर्माण झाला आहे.ग्रामपंचायतीकडून नुसती आश्वासने मिळत आहेत. या शेडचे बांधकाम करण्यासाठी दगड, वाळू गेली सहा महिन्यांपासून मटेरियल पडले आहे; परंतु कामाला सुरुवात होत नाही. त्यामुळे बोंबाळे ग्रामस्थ, शेतकरी वर्ग संतापला आहे. कोणतीही दुर्घटना घडण्याअगोदर बोंबाळे ग्रामपंचायतला जाग का येत नाही, असा सवाल ग्रामस्थांमधून होत आहे.पावसाळ्यात अंत्यविधी व सावडायला आल्यानंतर या शेडचा महिलांना, वृद्धांना, निवारा होता; परंतु आता भीतीने शेडजवळ कोणीही जात नाही. उन्हात व पावसाच्या दिवसांत पावसातच विधी ग्रामस्थांना करावा लागत आहे.तरी लवकरात लवकर ग्रामपंचायतीने व संबंधित खात्याने या शेडची दुरुस्ती करून घ्यावी, हा धोका टाळावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांमधून होत आहे. (वार्ताहर)
स्मशानभूमी शेडला भगदाड
By admin | Updated: December 2, 2014 21:27 IST