कऱ्हाड : छत्रपती शिवाजी महाराज यांची परंपरेनुसार येणारी शिवजयंती गुरुवार, दि. १३ रोजी येत आहे. मात्र, कोरोनामुळे शिवजयंती सार्वजनिक स्वरूपात साजरी न करता घरगुती साजरी करावी, असे आवाहन हिंदू एकता आंदोलनाचे प्रांताध्यक्ष, नगरसेवक विनायक पावसकर यांनी केले आहे. हिंदू एकतातर्फे शिवजयंतीनिमित्त संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत जिरंगे, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, उपजिल्हाध्यक्ष रुपेश मुळे, शहराध्यक्ष प्रकाश जाधव, विजय पावसकर यांनी आवाहन केले आहे. परंपरेनुसार येणारी शिवजयंती उत्सव शहर व परिसरात हिंदू एकता आंदोलन तर्फे भव्य स्वरूपात साजरी होते. मात्र यंदा कोरोनामुळे घरगुती पद्धतीने हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई
कऱ्हाड : शहरामध्ये विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून चौकशी करून कारवाई करण्यात येत आहे. विनाकारण फिरणाऱ्यांची वाहने पोलिसांनी जप्त केली असून वाहतूक शाखेत ती लावण्यात आली आहेत. शहरातील कोल्हापूर नाका, भेदा चौक, विजय दिवस चौक तसेच कृष्णा नाक्यावर पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. त्याठिकाणी वाहनधारकांची कसून चौकशी केली जाते. नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितावर कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे.
गावोगावच्या फ्यूजबॉक्सची दुर्दशा
तांबवे : कऱ्हाड ते पाटण मार्गावर रस्त्याकडेला अनेक ठिकाणी असलेले फ्यूजबॉक्स उघडे पडलेले आहेत. काही ठिकाणी हे बॉक्स अक्षरश: जमिनीला टेकले आहेत. तर काही ठिकाणी फ्यूजाही गायब झाल्या असून, तारांवर खेळ सुरू आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असून वीज वितरणने धोकादायक फ्यूजबॉक्स हटविण्याची मागणी होत आहे. पावसाळ्यात फ्यूजबॉक्समध्ये तांत्रिक बिघाड होऊन मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वीज वितरण कंपनीने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
पाटण मार्गावरील बसथांबे उद्ध्वस्त
मल्हारपेठ : गुहाघर-विजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. गत काही वर्षांपूर्वी रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. त्यावेळी रुंदीकरणासाठी कऱ्हाड-नवारस्ता यादरम्यान मार्गानजीक असलेली सर्व झाडे तोडण्यात आली. तसेच रस्त्यानजीकचे बसथांबेही भुईसपाट करण्यात आले आहेत. कऱ्हाड-पाटण या ३४ किलोमीटर अंतरातील अनेक थांबे जमीनदोस्त करण्यात आले आहेत. बसथांबा शेड नसल्यामुळे प्रवाशांना रस्त्यात उभे राहून एसटीची वाट पहावी लागत आहे. या मार्गावर संबंधित विभागाने बसथांबे उभारण्याची मागणी होत आहे.