पेट्री : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस कमालीची घट होत असून पाणीपातळी मोठ्या प्रमाणावर खालावू लागली आहे. आजपासून कास तलावाचा दुसरा व्हॉल्व्ह बंद करण्यात आला आहे. सर्वांत शेवटच्या म्हणजेच अंतिम तिसऱ्या व्हॉल्व्हद्वारे कासचा पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
सद्य:स्थितीला तलावात केवळ नऊ फूट पाणीसाठा शिल्लक आहे. तसेच यंदा पडलेल्या अवकाळी पावसाने कास तलावाच्या पाणीपातळीत कसलीच वाढ झाली नाही. उन्हाची तीव्रतादेखील जास्त असल्याने गतवर्षीच्या तुलनेत यंदा तलावात एका फुटाने पाणीसाठा कमी शिल्लक आहे. यामुळे वरुणराजा वेळेत बरसला नाही तर सातारकरांची तहान भागविणे जिकिरीचे होणार आहे.
शहराला कास तलावातील तीन व्हॉल्व्हद्वारे पाणीपुरवठा केला जातो. यापैकी पहिला व्हॉल्व्ह सव्वातीन महिन्यापूर्वीच उघडा पडला होता. त्यानंतर पाणीपुरवठा केला जाणारा दुसरा व्हॉल्व्हदेखील उघडा पडत चालला आहे. या दुसऱ्या व्हॉल्व्हद्वारे कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने सर्वांत खाली अंतिम तिसऱ्या व्हॉल्व्हद्वारे आजपासून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
साधारणपणे आठवडाभरात दुसरा व्हॉल्व्ह उघडा पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दगड अथवा अन्य कोणतीही वस्तू अडकून पाणीपुरवठा खंडित होऊ नये यासाठी कित्येक वर्षांपासून यावर नगरपालिकेने संरक्षक जाळी बसविली आहे. तिसऱ्या व्हॉल्व्हवर बसवण्यात आलेली संरक्षक जाळी पाणी कमी होत चालल्याने दिसून येत आहे.
चौकट
शहराला होत असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे दररोज तलावातील पाणीपातळी सव्वा ते दीड इंचाने कमी होत आहे. तलावातील पाणीपातळीत मोठ्या प्रमाणावर घट होत आहे. काही ठिकाणी पात्रातील जमिनीदेखील उघड्या पडल्याचे चित्र दिसत आहे. दिवसभर वातावरणात उष्णता अधिक तीव्रतेने भासत आहे. दिवसेंदिवस पाणी पातळी खालावतच चालली आहे.
कोट
सध्या कास तलावात नऊ फूट पाणीसाठा शिल्लक असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा एका फुटाने पाणीसाठा कमी असल्याने नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करणे आवश्यक आहे.
- जयराम किर्दत,
पाटकरी, कास तलाव
०२कास-तलाव
सातारा शहराला पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या कास तलावातील तिसऱ्या व्हॉल्व्हमधून पाणीपुरवठा करण्यात आला आहे. (छाया : सागर चव्हाण)