कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातल्या नदीकाठावर साखर पिकते; पण साखरेच्या शेतीला गांजाचा उतारा देण्याचा प्रयत्न काही शेतकरी करतायत. पैशाच्या हव्यासापोटी ते शेतात गांजाची रोपे लावत असून, शेतात लावलेली ही रोपटी सध्या मूळ धरू पाहतायत़
गांजा झिंग आणतो, मती सुन्न करतो़, त्यामुळे गांजाची लागवड बेकायदेशीर असल्याचे सर्वच शेतकऱ्यांना ज्ञात आहे. मात्र, काहीजण हौसेपोटी, तर काहीजण विक्री करण्याच्या उद्देशाने शेतात गांजाची रोपे लावत आहेत. जे शेतकरी फक्त हौसेपोटी अशी लागवड करतात त्या गांजाचा आसपासचे लोकच नशेसाठी किरकोळ स्वरूपात वापर करतात; मात्र विक्री करण्यासाठी लावलेल्या गांजाच्या रोपांमुळे तस्करीचे मोठे रॅकेट उभे राहत आहे.
सप्टेंबर २०११ मध्ये सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेने काले येथे छापा टाकून तब्बल १० लाखांचा गांजा जप्त केला होता़. त्यानंतर कऱ्हाड तालुका पोलिसांनीही गांजा तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस आणले होते. कोपर्डे हवेलीतही गांजा उत्पादक शेतकरी पोलिसांच्या जाळ्यात सापडला होता. त्याच्या शेतामधून त्यावेळी गांजाची ८ झाडे जप्त करण्यात आली होती. गत काही वर्षांत वारंवार अशा कारवाया पोलिसांकडून होत आहेत. मात्र, कारवाई होऊनही गांजा लागवड थांबत नसल्याचे दिसते. दोन दिवसांपूर्वीही काले येथे कऱ्हाड ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून शेतामधून गांजाची रोपे हस्तगत केली आहेत.
- चौकट
गुणधर्म औषधी; वापर नशेसाठी!
१) गांजाचे झाड अंबाडी वर्गातले आहे.
२) मुळात गांजा ही औषधी वनस्पती आहे़
३) औषधी गुणधर्मामुळे या वनस्पतीला महत्त्व आहे.
३) मात्र, औषधापेक्षा अनेकजण ते नशेसाठी वापरतात.
४) चुकीच्या वापरामुळे त्याची लागवड बेकायदा ठरविली आहे़
- चौकट
... कशी घेतात नशा?
१) धूम्रपान
२) जेवणातून
३) लेप पद्धतीने
- चौकट
... असा होतो परिणाम
१) गांजाचा परिणाम मेंदू, चेतातंतू, पचनसंस्था, रक्त व श्वसनसंस्थेवर होतो़
२) गांजा रक्तात मिसळल्यानंतर त्याचा परिणाम मात्रेप्रमाणे वाढत जातो़
३) मेंदूवर गांजा सेवनाचा पहिला परिणाम होतो़
४) कैफ चढणे, झोप लागणे, संवेदना नसणे, शरीर शिथिल, शक्तिहीन होते.
५) भूक मंदावते, अशक्तपणा येतो, हातपाय थरथरतात.
६) गोंधळणे, अस्वस्थ वाटण्यासारखे जिवघेणे दुष्परीणामही होतात़
- चौकट
चोरून गांजा पिकवताय..? मग हे वाचा...
अंमली पदार्थ कायद्यानुसार गांजाची लागवड अथवा तो जवळ बाळगणे हा गुन्हा आहे. गांजा स्वत:साठी किंवा दुसºयासाठी बाळगला तरी तो गुन्हाच ठरतो. गांजाची मात्रा किती, यावर दंड अवलंबून असतो. कमीत कमी सहा महिने सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंड तसेच वीस वर्षे सक्तमजुरीसह दोन लाखांपर्यंत दंडही या कायद्याने होऊ शकतो.
फोटो : २५केआरडी०१, ०२
कॅप्शन : प्रतिकात्मक