कराड : रस्ता झाल्यास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक किल्ले सदाशिवगडच्या पावित्र्यास बाधा पोहोचणार आहे. तसेच सदाशिवगडासह पर्यावरणाची मोठी हानी होणार आहे. लोकवर्गणीतून सदाशिवगडावर लाखो रुपयांची कामे झाली असताना आता रस्ता झाला तरच गडाचा विकास होईल? हा केवळ भ्रम असून, शासनाने सदाशिवगडावरील प्रस्तावित रस्ता रद्द करावा, अशी मागणी बाबरमाची ग्रामस्थांसह सदाशिवगड बचाव कृती समिती, शिवराय ट्रेकिंग ग्रुपने पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जयराम स्वामी वडगाव मठाचे मठाधिपती विठ्ठल महाराज स्वामी, प्रकाश बापूराव पवार, रमेश टोण्णे यांच्यासह बाबरमाची ग्रामस्थ, दुर्गप्रेमी नागरिक, शिवराय ट्रेकिंग ग्रुपसह सदाशिवगड बचाव कृती समितीकडून हे निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, बाबरमाची, डिचोली, तसेच राजमाची परिसरातील गडाच्या पायथा परिसरात दररोज काही तळीराम ओली पार्टी करतात. काहीजण गडावर येऊन गडावरील पठारावर बिनधास्तपणे दारू पित असतात. हजारमाची पायरी मार्गालगतही दारूच्या बाटल्या पडलेल्या असतात. गडावर रस्ता नसतानाही अशी परिस्थिती आहे. यापूर्वी आम्ही काही लोकांना, युवकांना पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे; मात्र ठोस कारवाई होत नाही. रस्ता झाल्यावर सायंकाळनंतर गडावर ओल्या पार्ट्या करण्यास कोणीही अटकाव करू शकणार नाही. राज्यात ज्या-ज्या गडावर रस्ता झाला आहे, तेथील पावित्र्य धोक्यात आल्याचेच दिसते. म्हणूनच किल्ले सदाशिवगडावर रस्ता करून राज्य शासनाला किल्ले सदाशिवगडास तळीरामांचा अड्डा करावयाचा आहे का?
किल्ले सदाशिवगडावर वनपर्यटनाच्या माध्यमातून शिवसृष्टी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मात्र, आजवर सदाशिवगडावर महत्त्वाकांक्षी पाणी योजनेसह अन्नछत्र, दोन स्वच्छतागृह, तसेच अन्य कामांसाठी लागणारे साहित्य दुर्गप्रेमींसह सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानला सहकार्य करणाऱ्या दुर्गप्रेमींनी हजारमाची पायथ्यापासून पायरी मार्गाने खांद्यावरून गडावर नेले आहे. त्यामुळे भविष्यात वनपर्यटनाच्या माध्यमातून गडावर शिवसृष्टी करावयाची झाल्यास सर्व साहित्य खांद्यावरून पायरी मार्गाने नेणे सहज शक्य आहे. वनपर्यटन आणि शिवसृष्टी या आडून रस्त्याचा घाट घालत गडाला, तसेच पर्यावरणास हानी पोहोचविणे कितपत योग्य आहे? याचा शासनाने विचार करणे आवश्यक आहे.
फोटो :