सातारा : दिवंगत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयातील रुग्णांची अवहेलना थांबवून सिटी स्कॅन, एमआरआय आणि एक्स-रे मशिन शासनातर्फे त्वरीत उपलब्ध करुन द्याव्यात तसेच विप्रोला दिलेला ठेका रद्द करण्यात यावा, अन्यथा आम आदमी पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हा संयोजक राजेंद्र चोरगे यांनी दिला आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील नागरिकांना उच्च दर्जाच्या व आधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा रुग्णालयात सिटी स्कॅन, एक्स-रे मशिन उपलब्ध करुन देण्यात आले होते. परंतु, मागील एक वर्षापासून ही सुविधा अचानकपणे बंद करण्यात आलेली आहे. येथील मशिन्स गायब केल्या आहेत. सर्वसामान्य जनतेला या सुविधांसाठी खासगी रुग्णालयात जावे लागत आहे. त्यामुळे आर्थिक भूर्दंड बसत आहे. तज्ञ वैद्यकीय अधिकारी मिळत नसल्याचे कारण पुढे करून आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी सिटी स्कॅन व एक्स-रे मशिन्सचा विभाग खासगी कंपनीकडे ठेकेदारी पध्दतीने नामी संकल्पना अंमलात आणून दिला आहे. राज्यातील ६ जिल्ह्याचे काम विप्रो या खासगी कंपनीकडे दिले आहे. या कंपनीकडे काम देताना शासकीय रुग्णालयातील रुग्णांव्यतीरिक्त उर्वरित वेळेत खासगी रुग्णालयातील रुग्णांसाठी रुग्णालयाचा दरवाजा उघडा ठेवला आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयातील रुग्णांना अधिक प्राधान्य मिळणार आहे. या कंपनीसाठी जिल्हा रुग्णालयातील तब्बल ३ हजार स्क्वे. फूट जागा बहाल केली आहे. यामुळे या खासगीकरणाला आमचा तीव्र विरोध आहे. परिणामी विप्रो कंपनीचा ठेका रद्द करावा, अशी आमची मागणी आहे. (प्रतिनिधी)
जिल्हा रुग्णालयातील खासगी ठेका रद्द करा
By admin | Updated: May 13, 2014 00:35 IST