औंध : छावणी चालकांची रखडलेली बिले व अडीअडचणी सोडविण्यासाठी माण-खटाव तालुक्यांतील छावणीचालकांनी काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख यांची भेट घेऊन, याप्रकरणी वरिष्ठ पातळीवर लक्ष घालून अडचणींतून मार्ग काढण्यासाठी शिष्टमंडळाने विनंती केली.
२०१८-१९ मध्ये खटाव-माण तालुक्यात दुष्काळाच्या भीषण झळांनी शेतकरी पशुधन जगवताना मेटाकुटीला आला होता. अशा स्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हरणाई उद्योग समूहाने पुढाकार घेऊन चारा छावण्या सुरू केल्या. यामुळे लाखमोलाचे पशुधन जगविण्यात शेतकरी यशस्वी झाला. मात्र, छावण्या बंद झाल्यानंतर छावणी चालकांची बिले शासनदरबारी रखडलेली आहेत. बिले अडकल्याने संस्था अडचणीत आल्या आहेत. यातून मार्ग निघावा, छावणी चालकांचे रखडलेले पैसे व अडीअडचणींसंदर्भात न्याय मिळावा, यासाठी सातारा जिल्ह्यातील माण-खटाव आणि फलटण तालुक्यांतील छावणी चालकांनी हरणाई सहकारी सूतगिरणीचे संस्थापक-अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांची भेट घेऊन समस्या सोडविण्यासाठी लक्ष घालण्याची मागणी केली.
यावेळी रासप जिल्हाध्यक्ष मामुशेठ वीरकर, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन खाडे, सदाशिव खाडे, सोमनाथ भोसले, तुषार ओंबासे, गजानन भोसले, नामदेव सावंत, सुभाष काटकर, सुभाष खाडे, प्रमोद जगदाळे, रामचंद्र जगदाळे, धर्मराज जगदाळे उपस्थित होते.
कोट..
चारा छावणी चालकाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी संबंधित मंत्र्यांची भेट घेऊन मंत्रालय स्तरावर बैठक लावण्यासाठी आग्रह धरला जाईल. या प्रश्नाचा शासनदरबारी पाठपुरावा करण्यासाठी कटिबद्ध आहे.
- रणजितसिंह देशमुख, संस्थापक, हरणाई उद्योग समूह
०१औंध
फोटो : रखडलेले चारा छावणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी छावणी चालकांच्या शिष्टमंडळाने रणजितसिंह देशमुख यांची भेट घेतली. यावेळी मामूशेठ वीरकर, अर्जुन खाडे, सोमनाथ भोसले यांच्यासह छावणीचालक उपस्थित होते. (छाया-रशिद शेख)