पाचगणी : तालुका पातळीवरील कमी असणारा कोरोना संसर्ग विचारत घेऊन पाचगणी पर्यटनस्थळावरील व्यावसायिकांच्या उपजीविकेचे साधन लक्षात घेता. आर्थिक नुकसान व होणारी उपासमार टाळण्यासाठी पर्यटन नगरीतील बाजारपेठ सुरू करण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी व्यापारी असोसिएशनच्यावतीने मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, पाचगणी ही बाजारपेठ पर्यटक, तसेच परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण आहे. नुकतीच चालू झालेली बाजारपेठ पुन्हा बंद न केल्याने कामगारांचे पगार, लाईट बिल, पाणी बिल, टॅक्स भरण्यास व्यापारी असमर्थ असून, लवकर बाजारपेठ खुली करावी, अशी व्यापाऱ्यांनी विनंती केली आहे.
येथील व्यापारी कोरोना नियमांचे पालन करून व्यवसाय करीत होते. परंतु, जिल्ह्याच्या इतरत्र भागात कोरोना संसर्ग फोफावतो आहे. त्याचा विपरीत परिणाम आमच्यावर होत आहे. महाबळेश्वर तालुक्यातील कमी रुग्ण संख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी पाचगणी पर्यटन स्थळावरील बाजारपेठ सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशा आशयाचे निवेदन मुख्याधिकारी यास देण्यात आले आहे. यावेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सर्व व्यापारी उपस्थित होते.