दहिवडी : ‘लोणी काळभोर येथून वडूजच्या एसटी आगारात डिझेल घेऊन निघालेल्या टँकरचालकाच्या केबीनला शॉर्टसर्किटने रविवारी दुपारी अचानक आग लागली. स्थानिक ग्रामस्थ व अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. यात पाच लाखांचे नुकसान झाले. याबाबत माहिती अशी की, टँकर (एमएच १२ एफसी ७१६०) पुण्याहून वडूजला डिझेल घेऊन निघाला होता. मोगराळे घाटातील एका वळणावर अचानक केबीनमध्ये क्लिनर बाजूस शॉर्टसर्किट होऊन आग लागली. चालक शिवराज मारुती कोडबळे याने सिलिंडरच्या साह्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. आगीने रौद्ररूप धारण केल्याने घाबरून चालक कोडबळे पळून गेला. यावेळी टँकरमध्ये १२ हजार लिटर डिझेल होते. केबीनमधील सर्व साहित्य, इंजिन जळून खाक झाले. यात सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले. डिझेल टाकीचा स्फोट होण्याची शक्यता असताना या घटनेची माहिती स्थानिकांनी व प्रवाशांनी पोलिसांना दिली. त्यानंतर फलटण ग्रामीणचे पोलिस निरीक्षक ए. बी. शेळके व दहिवडीचे सहायक पोलिस निरीक्षक युवराज हांडे यांनी फलटण व म्हसवड अग्निशमक बंब बोलावले. फलटण व दहिवडी रस्त्यावरील वाहतूक ठिकठिकाणी थांबवली होती. फलटण नगरपालिकेच्या अग्निशमन टँकरमधील संजय भोपळे, विकास गंबरे, योगेश कांबळे, अजिंक्य गोळे यांनी धाडसाने एक तास सुरू असलेल्या पेटत्या डिझेलच्या टँकरजवळ जाऊन अग्निशमन बंबाच्या मदतीने आग नियंत्रणात आणली. त्यानंतर म्हसवड नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाने त्या टँकरच्या टाकीला थंड करून पुन्हा एकदा सर्व टँकरवर पाणी मारले. फलटण, कोळकी, दुधेबावीत वाहने थांबवून संभाव्य धोका टाळण्यासाठी वाहतूक दोन्ही बाजूंनी बंद केल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. दुधेबावीचे पोलिस पाटील हणमंतराव पाटील, पोलिस मित्र चैतन्य सोनवलकर, बापूराव सोनवलकर, पिंटू ठोंबरे यांनी घटनास्थळी मदत केली. पोलिस निरीक्षक ए. बी. शेळके तपास करत आहेत. (प्रतिनिधी)
डिझेलच्या टँकरची केबीन भस्मसात
By admin | Updated: August 15, 2016 00:54 IST