कऱ्हाड : ‘प्राचीन काळात मंदिराच्या परिसरामध्ये देवराईच्या स्वरूपात विविध वृक्षवेलींना संरक्षण प्राप्त होत होते. त्याचप्रमाणे आता पाण्याच्या साठ्यांना अभय देऊन त्यांचे संरक्षण करणे गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी केले. येथील यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयाच्या भूगर्भशास्त्र विभागामार्फत आयोजित राज्यस्तरीय पाणी परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था सदस्य ए. एन. मुल्ला होते. शंकराप्पा संसुद्दी, शिरपूर प्रकल्पाचे जनक सुरेश खानापूरकर, प्राचार्य डॉ. एस. के. वडगबाळकर, प्राचार्य डॉ. जे. बी. पिष्टे, नांदेड विद्यापीठाचे डॉ. डी. बी. पानस्कर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. बजेकल, वेणुताई चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य बी. एन. कालेकर, डॉ. बी. एन. गोफणे, प्रा. यू. एन. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. पवार म्हणाले, ‘आपल्याकडे पाण्याचा गैरवापर आणि वाया जाणे, हे जास्त प्रमाणात आहे. अशुद्ध पाण्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून बाटलीबंद पाण्याकडे आपण वळतो; परंतु त्याच बाटल्या आणि इतर कचरा मात्र आपण नदीत, विहिरीत टाकतो, हे थांबवलेच पाहिजे. आपण आर्थिक नियोजनात खूपच बारकाईने लक्ष देतो. मुला-मुलींची शिक्षणे, लग्न, यासाठी नियोजनपूर्वक पैसे ठेवतो. तशी वेळ आता पाण्याच्या नियोजनाची आली आहे. अन्यथा आपल्या नातवंडांना कदाचित पाणीच मिळणार नाही. म्हणूनच पाण्याची अभयस्थाने निर्माण करणे, ही काळाची गरज आहे.’ परिषदेचे धुळे जिल्ह्यातील शिरपूर पॅटर्नचे जनक सुरेश खानापूरकर यांनी बीज भाषण केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ए. एन. मुल्ला यांनी पाण्यासाठी काटेकोर नियोजनाची आवश्यकता असल्याचे सांगितले. प्राचार्य डॉ. एस. एस. बजेकल यांनी स्वागत केले. प्रा. यू. एन. पाटील यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा प्रा. डॉ. आर. ए. सूर्यवंशी परिचय यांनी करून दिला. प्रा. आर. एस. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. बी. पी. रेळेकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
पाण्याची अभयस्थाने निर्माण करा
By admin | Updated: May 6, 2015 00:14 IST