वाठार स्टेशन : ब्रिटिशकालीन महत्त्व असलेल्या वाठार स्टेशन येथील रेल्वेस्थानकाच्या जीर्णोद्धाराचे काम नुकतेच हाती घेण्यात आले आहे. यामुळे या ऐतिहासिक वास्तुला झळाळी मिळणार असून ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.अनेक ऐतिहासिक चित्रपटात या ब्रिटिशकालीन स्थानकाचा समावेश आहे. ब्रिटिशकाळात व्यापारासाठी तसेच महाबळेश्वर, पाचगणीसारख्या थंड हवेच्या ठिकाणी वास्तव्यास येण्यासाठी या स्थानकाला महत्त्व होते. वैशिष्ठपूर्ण रचना असलेल्या या स्थानकाची काही वर्षांत दुरवस्था झाली होती. याठिकाणी अजूनही विविध समस्या आहेत. स्वच्छतागृह, भोजनकक्ष बंद आहेत. येथील ग्रामस्थांनी येथील प्लॅटफॉर्म उंची वाढविणे, प्रतीक्षा कक्ष सुरू करणे, याबाबत पुणे कार्यालयाला अहवाल पाठविला होता. या अहवालानुसार आता वाठार स्टेशनच्या इमारतीपासूनच नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. सद्य:स्थितीत या रेल्वे स्थानकावरील जुन्या कौलांचे छप्पर काढून या ठिकाणी पत्रा टाकण्याचे काम सुरू आहे. याशिवाय प्लॅटफॉर्म उंची वाढविण्याचेही काम हाती घेण्यात आले आहे. यामुळेही ब्रिटिशकालीन वास्तू आता नव्या रूपात अस्तित्वात येणार आहे.या बाह्य रंगरंगोटीप्रमाणेच येथील नागरिकांना भेडसावणाऱ्या स्वच्छतेबाबत नव्यानेच काही रेल्वे गाड्या थांबविण्याबाबत रेल्वे खात्याने लक्ष घातल्यास खऱ्या अर्थाने प्रवाशांना रेल्वेच्या विविध सेवांचा लाभ होणार आहे.येथील शिवसैनिक उत्तम रामचंद्र नलवडे, राजेंद्र शिंदे यांच्यासह अनेक कार्यकत्यानी रेल्वे विभागाकडे या कामासंदर्भात पाठपुरवठा केला होता. (वार्ताहर)
ब्रिटिशकालीन रेल्वेस्थानकाला मिळणार झळाळी
By admin | Updated: December 2, 2014 00:31 IST