सुमारे दीड वर्षापासून क-हाड ते कोकरूड या मार्गाचे रुंदीकरण सुरू आहे. या रुंदीकरणास पाचवड फाटा परिसरातून प्रारंभ करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या दोन प्रमुख विभागांना जोडणारा हा सर्वात जवळचा मार्ग आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम गतीने सुरू असून या मार्गावरील जुने पूल पाडण्यात येणार आहेत. त्यामुळेच उंडाळे व ओंड या दोन्ही गावांना जोडणारा क-हाड दक्षिण मांड नदीवर असलेला जुना पूल पाडून त्या ठिकाणी नवा पूल बांधण्यात येणार आहे. या मार्गावरील वाहतूक तुळसण, सवादे, शेवाळेवाडी, उंडाळे या मार्गे वळविण्यात आली आहे.
हा पूल यापूर्वीच पाडण्यात येणार होता. मात्र, माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांचे निधन झाल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊ नये, यासाठी पूल पाडण्याची कार्यवाही थांबविण्यात आली होती. पूल पाडण्यात आल्यानंतर नवीन पुलाचे काम काही महिन्यात पूर्ण होईल, अशी शक्यता आहे.
- चौकट
पर्यायी मार्गांची अवस्था बिकट
ओंड व उंडाळे या गावादरम्यान असलेला पूल परडल्यामुळे उंडाळे ते क-हाड यादरम्यान वाहतुकीचे अंतर वाढणार आहे. याशिवाय पर्यायी रस्त्याची परिस्थिती चांगली नसल्याने वाहन चालकांचा ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागणार आहे. रयत सहकारी साखर कारखाना सुरू असल्यामुळे या मार्गावर ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. परिणामी, वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याची चिन्हे आहेत.