पाटण : नुकत्याच झालेल्या पाटण पंचायत समितीच्या मासिक सभेत माजी आमदार व पाटणकर गटाच्या सभापतींनी सत्यजीत पाटणकर सभापती असताना ९९ टक्के निर्मलग्राम झालेला तालुका पुन्हा एकदा स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली असून याचा शुभारंभ ६ डिसेंबरपासून करण्याची घोषणा केली. तर या मोहीमेत कुणीही राजकारण न आणता सामील व्हावे असे आवाहन रामभाऊ शेलार यांनी केले. यावर आमदार शंभूराज देसाई गटाच्या सदस्यांनी कोणतेही आढेवेढे न घेता संमती दिली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर निर्मल मोहीमेचा झाडू हातात मरगळ झटकण्यासाठी पाटणकर गट सक्रीय झाला आहे. विधानसभा निवडणुकीत सत्यजित पाटणकर यांचा प्रचार करताना पाटणकर गटाने निर्मल केलेली गावे व त्याबाबत सत्यजितसिंहांनी सभापती असताना केलेली धडपड यावर चांगलाच भर दिला होता. पंचायत समितीत सत्त्ता असताना पाटणकर गटाने केवळ चार गावे वगळता संपूर्ण तालुका निर्मल केला होता. यानंतर शंभूराज देसार्इं यांनी पंचायत समितीवर सत्ता स्थापण केली. सभापती वनिता कारंडे यांना मात्र अडीच वर्षाच्या काळात चार गावे सुद्धा निर्मल करता आली नाही. आता मात्र पाटणकर गटाचा सभापती असून त्यांनी विधानसभेतील पराभवाची मरगळ झटकून निर्मल झालेली मात्र पुन्हा अस्वच्छ झालेली गावे झाडण्याची मोहीम हाती घेतली आहे. आमदारकी गेल्यानंतर केवळ सभापती पदावर भिस्त असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘स्वच्छ भारत अभियान’ या उपक्रमाचा धागा पकडून वातावरण निर्मिती करण्याचा हा प्रयत्न उशीरा का होईना आमदार देसाई गटाच्या लक्षात येणार आहे. त्यामुळे स्थापन केलेल्या निर्मल ग्राम समितीस विरोध होणार नसला तरी त्यामध्ये फाटाफूट होणार हे निश्चित. (प्रतिनिधी)देसाई गटाच्या भूमिकेकडे लक्षसभापती संगीता गुरव यांनी या मोहीमेचा शुभारंभ कोयनानगर येथे होईल असे सांगताच देसाई गटाचे उपसभापती डी. आर. पाटील यांनी कोयनानगर ऐवजी या मोहीमेचा शुभारंभ ढेबेवाडीतून करण्याचा प्रस्ताव मांडला; मात्र याला राजाभाऊ शेलार यांनी नकार दिला.
पाटणकर गटाच्या हाती झाडू
By admin | Updated: December 2, 2014 23:36 IST