सांगली : पाण्याचा हौद फुटून झरे (ता. आटपाडी) येथील बाळूबाई बुधा वाघमारे (वय ५२) व प्रांजली सचिन वाघमारे (२ वर्षे) या आजी-नातीचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. वाघमारे कुटुंबीयांनी पंधरा दिवसांपूर्वी सुमारे सात फूट उंच व सात फूट रुंदीचा हौद बांधला होता. या हौदामध्ये बाळूबाई वाघमारे यांचा मुलगा नितीन वाघमारे हा पाणी भरत होता. हौद पूर्णपणे भरत आला असताना तो फुटू लागला. काही वेळातच हौदाच्या चारही भिंती कोसळल्या. यावेळी बाळूबाई दूर पळण्याचा प्रयत्न करीत असताना, पाय अडखळून खाली कोसळल्या. तसेच दुसऱ्या भिंतीशेजारी खेळत असलेली प्रांजली ही भिंतीखाली सापडली. यामध्ये दोघीही गंभीर जखमी झाल्या. बाळूबार्इंना स्थानिक रुग्णालयात नेले, पण तेथे त्यांचा मृत्यू झाला. तसेच प्रांजलीला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. त्यामुळे तिला रस्त्यातूनच परत गावी नेण्यात आले. या हौदाचे बांधकाम पंधरा दिवसांपूर्वीच करण्यात आले होते. त्यामुळे ते कच्चे होते. पाणी पूर्ण भरले असताना बांधकामावर ताण पडून ते कोसळले. यामध्ये पाणी भरत असलेला नितीन वाघमारे हाही जखमी झाला. हौद फुटल्याने मोठा आवाज झाला. यामुळे आजुबाजूचे लोक जमा झाले. त्यांनी दोघींनाही रुग्णालयात दाखल केले. मात्र, डोक्याला जबर मार लागल्याने दोघींचाही मृत्यू झाला. याबाबत आटपाडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी) बांधकाम कच्चे वाघमारे कुटुंबीयांनी पंधरा दिवसांपूर्वी सुमारे सात फूट उंच व सात फूट रुंदीचा हौद बांधला होता. या हौदाचे बांधकाम पंधरा दिवसांपूर्वीच करण्यात आले होते. त्यामुळे ते कच्चे होते.
पाण्याचा हौद फुटून आजी, नात ठार
By admin | Updated: August 6, 2015 00:47 IST